Emerging Asia Cup 2023 Final: इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेवर पाकिस्तान अ संघाने नाव कोरले आहे. पाकिस्तान अ संघाने भारताच्या युवा ब्रिगेडचा 128 धावांनी दारुण पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 352 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 224 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 61 धावा केल्या. अभिषेक व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही.
भारतीय युवा ब्रिगेडने पाकिस्तानने दिलेल्या 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग विस्फोटक सुरुवात करत केला. अभिषेक शर्मा आणि साई सुदर्शन यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाला आव्हान गाठता आले नाही. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर भारताचा डाव ढेपाळला. एका बाजूला अभिषेक शर्मा याने अर्धशतक झळकावले, पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यानंतर भारतीय फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. यश धुल, रियान पराग, मानव सुतार, निकिन जोस , हर्षित राणा यांना मोठी खेळी करता आली नाही.
पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून साई सुदर्शन आणि अभिषेक सलामीला आले. सुदर्शन 28 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. तर अभिषेकने अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या. निकिन जोसने 11 धावा केल्या. कर्णधार यश धुलने 4 चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. निशांत सिंधू 9 धावा करून बाद झाला. रियान पराग 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हर्षित राणाने 13 धावांचे योगदान दिले. राज्यवर्धन 11 धावा करून बाद झाला. मानव सुतार 7 धावा करून नाबाद राहिला.
पाकिस्तानचा धावांचा डोंगर -
इमर्जिंग आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 352 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानकडून तैयब ताहिरने शानदार शतक झळकावले. त्याने 108 धावांची खेळी केली. साहिबजादा फरहानने ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून रियान पराग आणि राज्यवर्धन यांनी २-२ बळी घेतले. निशांत सिंधू, मानव सुथार आणि हर्षित राणा यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.
सलामी फलंदाज सॅम अयुब आणि साहिबजादा फरहान यांनी पाकिस्तान संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. अयुबने 51 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. फरहानने 62 चेंडूत 65 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. उमर युसूफने 35 धावांचे योगदान दिले. ताहिरने शानदार कामगिरी करताना शतक झळकावले. त्याने 71 चेंडूत 108 धावा केल्या. ताहिरच्या शतकी खेळीत 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
भारताकडून रियान पराग याने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. राज्यवर्धनने 6 षटकात 48 धावा देत 2 बळी घेतले. हर्षित राणाने 6 षटकात 51 धावा देत एक विकेट घेतली. मानव सुतारने 9 षटकात 68 धावा देत एक विकेट घेतली. निशांत सिंधूने 8 षटकात 48 धावा देत एक विकेट घेतली.