IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना उद्या म्हणजे 27 ऑगस्टला श्रीलंका- अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (28 ऑगस्ट) बहुप्रतिक्षीत सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. आशिया चषकात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) भारतीय संघात पुनरागमन झालंय. त्यानं इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकाची मालिका खेळल्यानंतर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहली आता पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विराटचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असेल. यापूर्वी विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली? यावर एक नजर टाकुयात. 


पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचं प्रदर्शन
विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी केलीय. पाकिस्तानविरुद्ध सात डावात त्यानं 77.75 च्या सरासरीनं 311 धावा केल्या आहेत. यावेळी विराट कोहलीनं तीन अर्धशतक झळकावली आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्रईक रेट 118.25 इतका होता. एवढंच नव्हे तर, पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं तीन वेळ सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. 


विराट 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहलीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. विराटनं आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. पाकिस्तानविरुद्ध त्याचा 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असणार आहे. यानंतर विराट कोहलीच्या खास विक्रमाला गवसणी घालेल. भारतासाठी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार विराट कोहली दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. भारतासाठी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे. रोहित शर्मानं भारतासाठी आतापर्यंत 132 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार 74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


हे देखील वाचा-