Asia Cup 2022 : भारतीय संघ आगामी आशिया कप 2022 (Asia Cup 2022) साठी सज्ज झाला आहे. 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याने भारत स्पर्धेची सुरुवात करणार आहे. दरम्यान दोन्ही संघ आता या महामुकाबल्यासाठी कसून सराव करत आहेत. दोन्ही संघाचे फलंदाज कसून सराव करत असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोहम्मद रिझवानचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.


या व्हिडीओला साऊंड ऑन (SOUND ON) असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनमागे कारण म्हणजे दोघेही सराव करताना ज्याप्रकारे शॉट खेळत आहेत, त्यातून अगदी कडक असा आवाज येताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये भारताचे गोलंदाज विराट आणि रोहितला नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. दोघांकडून अगदी दर्जेदार शॉट्स पाहायला मिळत आहेत.









गोलंदाजीचं काय?


आता भारतीय संघाचा विचार करता आजच्या तारखेला भारत अव्वल दर्जाचे दोन आंतरराष्ट्रीय संघ एकावेळी खेळवू शकतो, त्यामुळे बुमराह, पटेल नसतानाही भारताकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये बुमराह नसल्याने असणारी अनुभवाची कमतरता स्वींग किंग भुवनेश्वर कुमार भरुन काढू शकतो. त्यानंतर वेगवान अटॅकसाठी युवा गोलंदाजाची जोडी अर्शदीप सिंह आणि आवेश खान आहेच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी पाकिस्तानपेक्षा भारताकडे अधिक आणि ताकदवार आहे ती म्हणजे फिरकी गोलंदाजी. भारताचा रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई या टॉप फिरकीपटूंपैकी ज्यानांही संधी मिळेल ते या संधीचं नक्कीच सोनं करतील. या सर्वाशिवाय एक्स फॅक्टर म्हणून हार्दीक पांड्याची बोलिंग आहेच. त्यामुळे भारत एक पॉवरपॅक गोलंदाजी युनिट घेऊन मैदानात उतरेल यात शंका नाही.


दुसरीकडे पाकिस्तानचा विचार करता, शाहीन आफ्रिदीची अनुपस्थिती संघाची डोकेदुखी नक्कीच वाढवू शकते. पण संघ व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या संघानुसार शाहीनसाठी त्यांनी नसीम शाह या 19 वर्षीय गोलंदाजाचा विचार केला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी फेमस नसीमच्या वेगापासून भारतीय फलंदाजांना सावध राहावं लागणार आहे. याशिवाय मोहम्मद वसीम ज्युनियर, शाहनवाज दहनी या मीडियम फास्ट बोलर्सचीही ताकद पाकिस्तानकडे आहे. तसंच शाहीनच्या जागी संधी देण्यात आलेला मोहम्मद हसनैन याच्याबद्दलही भारताला विचार करावा लागेल, कारण केवळ 19 वर्षीय मोहम्मदच्या गोलंदाजीत वेग आणि स्वींग दोन्ही असल्यानं त्याच्यापासून फलंदाजांना मोठा धोका आहे. याशिवाय फिरकी गोलंदाजीची जबाबदारी शादाब खान आणि उस्मान कादिर यांच्याकडे असेल. 



हे देखील वाचा-