Wankhede Pitch Report:  विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय. या सामन्यात यजमान भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. भारतानं विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात  नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उभय संघ वानखेडेच्या मैदानात आमनेसामने येत आहेत.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल.  हीच नाणेफेक या सामन्याचा विजेता ठरवणार आहे. होय... वानखेडेवरील आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिल्यास नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचे पारडे जड असल्याचे दिसतेय. 


वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकाचे चार सामने झाले आहेत. चारही सामने डे नाइट होते. या चारही सामन्यात परिस्थिती एकसारखी राहिली आहे. चारही सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झालाय. त्यातुलनेत दुसऱ्या डावात फलंदाजी करताना संघर्ष करायला लागल्याचे दिसतेय. दुसऱ्या डावात पहिल्या 20 षटकं प्रत्येक संघासाठी खराब राहिली आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये वानखेडे स्टेडियम पहिल्या तीन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर धावांचा पाठलाग करणारा संघ स्वस्तात ढेर झाला. 


भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या उपांत्य सामन्याच्या निमित्तानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकातला पाचवा सामना खेळवण्यात येत आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. त्यामुळं नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ वानखेडेवर पहिल्यांदा फलंदाजी घेणं पसंत करतो. विश्वचषकाच्या साखळीत दक्षिण आफ्रिकेनं वानखेडेवरच्या पहिल्या दोन आणि भारतानं तिसऱ्या सामन्यात पहिली फलंदाजी करून तब्बल साडेतीनशेहून अधिक धावांचा डोंगर उभारला होता. तिन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला त्या आव्हानाचा पाठलाग करता आला नव्हता. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्ताननं दिलेल्या 292 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती द्विशतकानं ऑस्ट्रेलियानं ती किमया साधता आली होती. पण ऑस्टेलियाचे सात फलंदाज फक्त 91 धावांत तंबूत परतले होते. 


खेळपट्टी कशी असेल - 


आतापर्यंत झालेल्या चार सामन्याप्रमाणेच आजचीही खेळपट्टी राहील असा अंदाज आहे. म्हणजेच, नाणेफेक जिंका, सामने जिंका.. हा फॉर्मुला झालाय. म्हणजेच, वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करतो. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पहिल्या 20 षटकात संघर्ष करावा लागतो. फ्लड लाईट्समध्ये चेंडू अधिक स्विंग होते, त्यामुळे फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरते.  पण पहिली 20 षटकं खेळून काढल्यास पुढील 30 षटकांत धावांचा पाऊस पडतो. 



टीम इंडियाच्या खांद्यावर देशभरातील अब्जावधी लोकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. अशातच रोहितसेना प्रचंड मोठ्या दबावाखाली असणार हे मात्र नक्की. पण अशातच कर्मधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांनाही विश्वास आहे की, टीम इंडिया देशवासियांची मनं अजिबात मोडणार नाही. रोहितनं नाणेफेक जिंकून योग्य निर्णय घ्यावा, अशी प्रार्थना सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता करतोय. वानखेडेच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ फ्लडलाईटमध्ये झटपट विकेट गमावत असल्याचं आपण यापूर्वीच्या सामन्यांमध्ये पाहिलं आहे. कारण नवीन चेंडूला जबरदस्त स्विंग मिळतो. टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे गोलंदाज नव्या चेंडूनं खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल यांच्यावर बरंच काही अवलंबून असेल.