IND vs NZ World Cup 2023 : भारताचा फायनलमध्ये प्रवेश, न्यूझीलंडला 70 धावांनी हरवले, मोहम्मद शामीच्या सात विकेट
वानखेडेवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारातने फायनलमध्ये धडक मारली आहे.
IND vs NZ World Cup 2023 : वानखेडेवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारातने फायनलमध्ये धडक मारली आहे. विराट कोहली अन् श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शामीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. मोहम्मद शामीने न्यूजीलंडच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारताने दिलेल्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांपर्यंत मजल मारु शकला. शामीने सर्वाधिक सात विकेट घेतल्या. डॅरेल मिचेल याने 134 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली.
भारताने दिलेल्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. डेवेन कॉनवे याला फक्त 13 धावा करता आल्या. रचिन रविंद्र यालाही मोठी खेळी करता आली नाही. रचिन रविंद्र याने 22 चेंडूत 13 धावा केल्या. 39 धावांत न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतले. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी झुंज दिली. केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी भारताच्या गोलंदाजांचा प्रतिकार केला. केन विल्यमसन याने संयमी फलंदाजी केली तर डॅरेल मिचेल याने हल्लाबोल केला. मिचेल आणि केन विल्यमसन यांच्यामध्ये 181 धावांची भागिदारी झाली. ही जोडी मैदानावर होती, तोपर्यंत सामना न्यूझीलंड जिंकेल असेच वाटत होते. पण भारताने पुन्हा एकदा कमबॅक केले. मोहम्मद शामीने एकाच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. आधी जम बसेलेल्या केन विल्यमसन याला तंबूत पाठवले. त्यानंतर टॉम लॅथम याचाही अडथळा दूर केला.
केन विल्यमसन याने 73 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता. केन विल्यमसन याने विराट कोहलीप्रमाणे एक बाजू लावून धरली. पण त्याला शतकामध्ये रुपांतर करता आले नाही. विल्यमसन याच्यानंतर टॉम लेथमही शून्यावरच परतला. लेथम गेल्यानंतर ग्लेन फिलिप्सने डॅरेल मिचलला साथ दिली. डॅरेल मिचेल याने ग्लेन फिलिप्स याला हाताशी धरत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पाचव्या विकेट्ससाठी या दोघांमध्ये 61 चेंडूत 75 धावांची भागिदारी झाली. ही जोडी धोकादायक ठरते की काय? असेच वाटत होते. पण बुमराहने ग्लेन फिलिप्सचा अडथळा दूर केले. फिलिप्सने 33 चेंडूत दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. फिलिप्स तंबूत परल्यानंतर मार्क चॅम्पमनही तंबूत परतला त्याला कुलदीपने तंबूचा रस्ता दाखवला. चॅम्पमन बाद झाल्यानंतर शामीने जम बसलेल्या डॅरेल मिचेल यालाही बाद करत भारताच्या विजय निश्चित केला. पण औपचारिकता बाकी राहिली होती. अष्टपैलू मिचेल सँटनर यालाही फक्त आठ धावांचे योगदान देता आले, त्याला सिराजने बाद केले.
डॅरेल मिचेल याने एकाकी झुंज देत भारताच्या माऱ्याचा यशस्वी प्रतिकार केला. डॅरेल मिचेल याने 119 चेंडूमध्ये 134 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये सात षटकार आणि नऊ चौकारांचा समावेश होता. डॅरेल मिचेल याने आधी कर्णधार केन विल्यमसन याच्यासोबत 171 धावांची भागिदारी केली. त्यानंतर फिलिप्ससोबत 71 धावांचीही जोडी केली.
भारताची गोलंदाजी कशी राहिली ?
मोहम्मद शामीने याने भेदक मारा केला. त्याने 9.5 षटकात 57 धावा खर्च करत सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
जसप्रीत बुमराहने 10 षटकात 64 धावा खर्च केल्या अन् एक विकेट घेतली. त्याशिवाय त्याने एक षटक निर्धाव फेकले.
मोहम्मद सिराज याने 9 षटकात 78 धावा खर्च करत एक विकेट घेतली.
कुलदीप यादवने 10 षटकात 55 धावा खर्च करत एका फलंदाजाला तंबूत धाडले. कुलदीप यादवने मार्क चॅम्पमन याला तंबूत पाठवले.
रविंद्र जाडेजाला आजच्या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. जाडेजाने 10 षटकात 63 धावा खर्च केल्या. जाडेजाने फिल्डिंगमध्ये तीन जबराट झेल घेतले.