IND vs NZ Semi-Final Pitch Update: भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या उपांत्य सामन्याच्या निमित्तानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकातला पाचवा सामना खेळवण्यात येत आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. त्यामुळं नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ वानखेडेवर पहिल्यांदा फलंदाजी घेणं पसंत करतो. आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघालाच जास्त फायदा झालाय. पण प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सेमीफायनलसाठी वानखेडेची खेळपट्टी बदलण्यात आली आहे. उपांत्य सामन्यासाठी वानखेडे स्टेडिअमची खेळपट्ट संथ असेल, असे बोलले जात आहे. संघ व्यवस्थापनाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या पीच क्यूरेटरला वानखेडे स्टेडिअमच्या खेळपट्टीवरून गवत काढण्यास सांगितलेय. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यातील खेळपट्टीवर गवत कमी असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कमी धावसंख्या होईल असे वाटतेय. 


खेळपट्टीवरील गवत काढल्यामुळे खेळपट्टी संथ होईल. त्यामुळे फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरेल. रिपोर्ट्सनुसार, खेळपट्टी संथ असेल पण फिरकीला मदत करणारी नसेल. संघाच्या मागणीनंतर खेळपट्टीवरील गवत काढण्यात आलेय. दरम्यान, मागील काही वर्षांत टीम इंडियाने घरच्या मैदानावर संथ खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली आहे. विश्वचषकापूर्वी संघ व्यवस्थापनाने आपले सामने संथ खेळपट्टीवर खेळवण्याची विनंती केली होती. आता सेमीफायनलसाठी संथ खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. यंदाच्या विश्वचषकात खेळपट्ट्या जशा होत्या, तशी ही खेळपट्टी नसेल. या खेळपट्टीवर धावांचासाठी संघर्ष कारावा लागू शकतो. दुसऱ्या डावात खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत कमी मिळेल. 


वानखेडेच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलचा सामना होणाऱ्या खेळपट्टीवरुन गवत काढण्यात आलेय.  म्हणजेच, वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांना येथे जास्त मदत मिळेल. खेळपट्टीवर चेंडू अतिरिक्त वळणार नाही, पण अचूक टप्प्यावर मारा केल्यास फिरकी प्रभावी ठेरल. 
 


आतापर्यंत कशी राहिली खेळपट्टी ?


विश्वचषकाच्या साखळीत दक्षिण आफ्रिकेनं वानखेडेवरच्या पहिल्या दोन आणि भारतानं तिसऱ्या सामन्यात पहिली फलंदाजी करून तब्बल साडेतीनशेहून अधिक धावांचा डोंगर उभारला होता. तिन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला त्या आव्हानाचा पाठलाग करता आला नव्हता. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्ताननं दिलेल्या 292 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती द्विशतकानं ऑस्ट्रेलियानं ती किमया साधता आली होती. पण ऑस्टेलियाचे सात फलंदाज फक्त 91 धावांत तंबूत परतले होते.