India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडकडून डावाची सुरुवात करताना रचिन रवींद्र आणि विल यंग या जोडीने संघाला तुफानी सुरुवात दिली आणि पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. किवी संघाने विल यंगच्या रूपात पहिली विकेट गमावली, तर त्यानंतर या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रचिन रवींद्र कुलदीप यादवच्या गुगलीत फसला.




कुलदीपच्या गुगलीत फसला रचिन रवींद्र...


अंतिम सामन्यात रचिन रवींद्रने तुफानी फटकेबाजी करत पहिल्याच षटकांपासून भारतीय संघाच्या गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे किवी संघाने पहिल्या 10 षटकांच्या अखेरीस एका विकेटच्या मोबदल्यात 69 धावा केल्या. यानंतर, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने डावातील 11 वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादवकडे चेंडू सोपवला, ज्याने पहिलाच चेंडूवर रॅचिनला क्लीन बोल्ड  केले. 




आऊट झाल्यानंतर रॅचिन ही खेळपट्टीकडे पाहत राहिला, कारण पडल्यानंतर चेंडू वेगाने आत आला आणि थेट विकेटवर जाऊन लागला. ही विकेट भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची होती कारण रचिन एका टोकापासून वेगाने धावा काढत होता. आपल्या 37 धावांच्या खेळीदरम्यान, रचिनने 4 चौकार आणि 1 षटकार मारला.


रोहित शर्माच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन व्हायरल 


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जेव्हा श्रेयस अय्यरने रचिन रवींद्रचा झेल सोडला, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. विराट कोहलीची आणि रोहित शर्माची पत्नी नाराज दिसत होत्या. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. पण, कुलदीप यादवने लवकरच रचिन रवींद्रला आऊट केल्यानंतर अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह आनंदी दिसल्या. कुलदीप यादवने रचिन (37) आणि केन विल्यमसन (11) यांना स्वस्तात बाद केले.




चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रचिन रवींद्रचा डंका


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये, रचिन रवींद्रने अंतिम सामन्यात 37 धावांची खेळी करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. रचिनने 4 डावांमध्ये 65.75 च्या सरासरीने एकूण 263 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, विराट कोहलीला त्याला मागे टाकण्याची संधी आहे, ज्याने आतापर्यंत 217 धावा केल्या आहेत. कोहली आणखी 46 धावा काढताच या यादीत रचिनला मागे टाकेल.