IND vs NZ 3rd Test Pitch : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. अशा परिस्थितीत क्लीन स्वीप टाळण्यासाठी टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत होणारी शेवटची कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकायची आहे. मुंबईच्या कसोटीसाठी टीम इंडियाने खेळपट्टीबाबत मोठी योजना आखली आहे, पण टीम इंडिया आपल्या जाळ्यात फसणार का हा मोठा प्रश्न आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटीसाठी खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठेवण्यात आली होती. पण इथे टीम इंडियापेक्षा न्यूझीलंडचे फिरकीपटू अधिक प्रभावी ठरले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईतील वानखेडे येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी तयार केली जात आहे. म्हणजे अशी खेळपट्टी जिथे फलंदाजांना पहिल्या दिवशी मदतीची अपेक्षा असेल आणि दुसऱ्या दिवसापासून या खेळपट्टीवर टर्न दिसेल, ज्याचा फायदा फिरकीपटूंना होईल.
टीम इंडिया फसणार आपल्याच जाळ्यात?
मालिकेतील पहिली कसोटी बंगळुरू येथे खेळली गेली, ज्यामध्ये खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही साथ देणारी होती. बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडने खेळपट्टीचा फायदा घेत विजयाची नोंद केली. त्यानंतर पुण्याच्या फिरकीच्या ट्रॅकवर न्यूझीलंडचा संघ यशस्वी ठरला. आता मुंबईत खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीतही न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाचे मनसुबे उधळून लावू शकतो. आता मुंबई कसोटीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर पुण्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात किवी संघाने टीम इंडियाचा 113 धावांनी पराभव करत मालिका जिंकली.
हे ही वाचा -
IPL 2025 Mega Auction : लिलावाआधी RCBच्या गळाला लागला मोठा मासा, थेट होणार संघाचा नवा कर्णधार?