मुंबई : आगामी भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) टी20 मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या (Team India) सिनियर खेळाडूंना आराम देण्यासाठी म्हणून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यातीलच एक खेळाडू म्हणजे रिंकू सिंह (Rinku Singh). इंडियन प्रीमियर लीग 2023 चा हंगामात चर्चेत आलेला खेळाडू रिंकू सिंह लवकरच भारतीय संघाकडून पदार्पण करणार आहे.
रिंकू सिंहला पदार्पणाची संधी मिळणार?
टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यासाठी रिंकू सिंहला संधी दिली आहे. त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. रिंकूने सोशल मीडियावर टीम इंडियाच्या जर्सीमधील फोटो शेअर केले आहेत. टीम इंडियासोबतच्या सरावादरम्यानचे हे फोटो आहेत. रिंकूने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातामध्ये बॅट आहे.
भारत आणि आयर्लंड मालिका
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि आयर्लंड टी-20 मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी20 सामना रंगणार आहे.
जेव्हा स्वप्नांना पंख फुटतात
दरम्यान, आयर्लंड दौऱ्यावर रिंकू सिंहसोबत जितेश शर्मालाही संधी मिळणार आहे. बीसीसीआय (BCCI) या युवा खेळाडूंसाठी ट्विटरवर खास पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ''भारतासाठी खेळण्याची संधी मिळाल्याच्या फोन कॉलपासून ते पहिली फ्लाइट आणि टीम इंडिया (Team India) सरावापर्यंत... जेव्हा स्वप्नांना पंख फुटतात... रिंकू सिंह आणि जितेश शर्मासोबतची खास मुलाखत पाहा.''
आयर्लंड दौऱ्यात 'या' खेळाडूंना विश्रांती
बीसीसीआयने आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही युवा खेळाडूंसाठी एक उत्तम संधी मानली जात आहे. आयर्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हे खेळाडू मैदानावर खेळताना दिसणार नाहीत.
संबंधित इतर बातम्या :