Rinku Singh in IPL : कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसण्याची वेळ, नववी फेल खेळाडू ठरला केकेआरचा सुपरस्टार, रिंकू सिंहच्या संघर्षाची कहाणी
Rinku Singh Sixes in IPL 2023 : क्रिकेटच्या मैदानात कधीही काहीही होऊ शकतं. हेच दाखवलंय कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) अविश्वसनीय फलंदाज रिंकू सिंहने (Rinku Singh).
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ 6 चेंडूत 29 धावांची गरज असताना सलग 5 षटकार (Rinku Singh Sixes) ठोकून रिंकू सिंगने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करुन दाखवली. या अविश्वसनीय घटनेमुळे आजपर्यंत क्रिकेटच्या मैदानात तितकंसं चर्चेत नसलेलं रिंकूचं नाव, आज जगभरात पोहोचलं आहे.
गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेला हा थरारक सामना, रिंकूने एकहाती फिरवला.
6 चेंडूत 29 धावांची गरज असताना, गुजरातचा स्टॅण्डिंग कर्णधार राशीद खानने (Rashid Khan) ती ओव्हर यश दयालला (Yash Dayal) सोपवली. उमेश यादवने (Umesh Yadav) 1 रन काढून रिंकूला स्ट्राईक दिला.
कोलकात्याला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 5 चेंडूत 28 धावांची गरज होती. मग रिंकूने यश दयालला कव्हरवरुन सिक्सर लगावला. त्यानंतर पुढच्या सर्व चेंडूंवर रिंकूने षटकार ठोकले. त्यामुळे गुजरातचं 205 धावांचं आव्हान कोलकात्याने 7 विकेट्सच्या मोबदल्यात थरारकरित्या पार केलं.
रिंकू सिंहने ज्याप्रकारे थरारक खेळी करुन, गुजरातचा विजय जबड्यातून खेचून आणला, त्याच पद्धतीने त्याच्या आयुष्याची कहाणीही तितकीच थरारक आहे.
रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशच्या अलिगढचा. तिथेच त्याचं कुटुंब राहतं. रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. 5 भावंडांमध्ये रिंकू हे तिसरं अपत्य. रिंकूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ते गॅस सिलेंडर डिलिव्हरीचं काम करायचे.
तिकडे रिंकूला शाळेत असल्यापासूनच क्रिकेटची तुफान आवड होती. ज्यावेळी टीव्हीवर मॅच लागलेली असायची, त्यावेळी रिंकू टीव्हीसमोरुन हटत नव्हता. क्रिकेटवर त्याचं केवळ प्रेम नव्हतं तर क्रिकेट हे त्याचं वेड होतं. शाळेत असल्यापासूनच तो क्रिकेट खेळतो.
तेव्हापासून 'धुलाई' हे त्याचं नियमित काम आहे. समोर कोणताही बोलर असो, त्याने फेकलेला यॉर्कर असो वा बाऊन्सर, त्याला सीमापार पोहोचवण्यासाठी रिंकू प्रसिद्ध होता. तेच त्याने कालच्या गुजरातविरुद्धच्या मॅचमध्येही दाखवून दिलं.
रिंकूनेही क्रिकेटच्या वेडापाई घरच्यांचा अनेकवेळा मार खाल्लाय. रिंकू सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याचे वडील भलतेच चिडायचे. रिंकूने याबाबत म्हटलंय, मी क्रिकेट खेळू नये असं माझ्या वडिलांना वाटायचं. क्रिकेटमध्ये माझा वेळ बरबाद व्हावा अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. कधीकधी मला मारही खावा लागायचा.