IND vs ENG Test Series : इंग्लडविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने पुन्हा एकदा जोमाने पुनरागमन करत मालिका खिशात घातली आहे. हैदराबाद कसोटीत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. भारताने 3-1 ने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या 'बॅझबॉल' पद्धतीचा टीम इंडियाने मालिकेत अक्षरश: चुरडा केलाय. रोहित सेनेचा घरच्या मैदानावरिली विजयरथ कायम राहिलाय. मात्र, असे असले तरीही इंग्लंडमध्ये रांची कसोटीत टीम इंडियाला चांगलीच टक्कर दिलीये. एकवेळ भारताचा पराभव होईल, असेच वाटत होते. मात्र, शेवटी भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल ढाल बनून उभे राहिले. त्यामुळेच भारताला विजय मिळवता आला. मात्र, टीम इंडियाचा कोणत्या 5 कारणांमुळे विजय झाला? जाणून घेऊयात..
1. ध्रुव जुरेलची 90 धावांची खेळी
भारताच्या पहिल्या डावात 177 धावांवरच 7 विकेट्स पडल्या होत्या. ध्रुव जुरेलचा हा दुसराच सामना होता. शिवाय त्याला टेलेंडर्ससोबत फलंदाजी करावी लागणार होती. जुरेलने जबाबदारीने फलंदाजी केली. तो केवळ दुसरा सामना खेळतोय, असे कोणलाही जाणवले नाही. टीम इंडियाकडून एका खेळाडूला मोठी खेळी करणे गरजेचे होते. अशा वेळी त्याने 149 चेंडूमध्ये 90 धावांची खेळी केली. यामध्ये 6 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता.
2. कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेलची भागिदारी
इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात भारताने सुरुवात करताच टॉप ऑर्डर फ्लॉप ठरला. भारताची अवस्था 177 वर 7 बाद अशी झाली होती. त्यामुळे टीम इंडिया चांगलीच अडचणीत आली होती. 200 धावा बनवणे ही कठीण वाटत असताना ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादवने भागिदारी रचली. दोघांमध्ये 8 व्या विकेटसाठी 76 धावांची भागिदारी झाली. याच भागिदारीमुळे संपूर्ण बाजी पलटली. कुलदीपने 131 चेंडूंचा सामना करत 28 धावा केल्या. तर जुरेलने 90 धावांची खेळी केली.
3. अश्विन-जाडेजाच्या फिरकीची कमाल
रांची कसोटीत अश्विन-जाडेजाच्या फिरकीने कमला दाखवली. इंग्लंडच्या पहिल्या डावात रवींद्र जाडेजाने 4 तर अश्विनने 1 विकेट् पटकावली. तर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सर्व विकेट्स फिरकीपटूंनीच पटकावल्या. दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने 5 विकेट्स पटकावल्या. कुलदीप यादवने 4 तर रवींद्र जाडेजाने 1 विकेट पटकावली होती.
4. रोहित-जैस्वालकडून दमदार सुरुवात
इंग्लंडने रांची कसोटीत टीम इंडियापुढे 192 धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात भारताच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. रोहित आणि यशस्वीने सुरुवातीला फटकेबाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागिदारी रचली. रोहितने 55 धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने 37 धावांचे योगदान दिले.
5. शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलची भागिदारी
इंग्लंडच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा मध्यक्रम पूर्णपणे फ्लॉप ठरला. 120 धावांवर भारतीय संघाने 5 विकेट्स गमावल्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ध्रुव जुरेलने शुभमन गिलला साथ दिली. दोघांच्या भागिदारीने टीम इंडियाचा मार्ग सुखकर केला. दोघे भारताला विजय मिळवून देऊनच तंबूत परतले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 72 धावांची भागिदारी रचली. गिलने नाबाद 52 धावा केल्या तर जुरेलने 39 धावांचे योगदान दिले.
इतर महत्वाच्या बातम्या