IND vs ENG, T20 World Cup 2024 :  रोहित शर्माचं शानदार अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या झंझावती 47 धावांच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 171 धावांपर्यंत मजल मारली.  भारताकडून विराट कोहली, शिवम दुबे आणि ऋषभ पंत उपांत्य सामन्यात फेल ठरले. अखेरीस हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली.  इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, जोफ्रा आर्चर, लियाम लिव्हिंगस्टोन यांनी भेदक मारा केला. इंग्लंडला विजयासाठी 172 धावांचे आव्हान मिळाले आहे. 


पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना प्रभावित झाला. उपांत्य सामना उशीरा सुरुवात झाला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंड आणि भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात अतिशय खराब झाली. विराट कोहली आणि ऋषभ पंत ठरावीक अंतराने बाद झाले. पण रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.


रोहित शर्माचं शानदार अर्धशतक - 


रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासून आपला आक्रमक अंदाज दाखवला. विराट कोहली आणि ऋषभ पंत बाद झाल्यानंतरही रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवली.  सूर्यकुमार यादव याच्यासोबत रोहित शर्माने अर्धशतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. रोहित शर्माने 39 चेंडूमध्ये 57 धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीला दोन षटकार आणि सहा चौकारांचा साज होता. रोहित शर्मा यानं ऑस्ट्रेलियाविरोधात 92 आणि आज इंग्लंडविरोधात 57 धावांची खेळी केली. रोहित शर्माने सलग दोन सामन्यात अर्धशतके ठोकली आहे. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवसमोबत चौथ्या विकेटसाठी 50 चेंडूमध्ये 73 धावांची भागिदारी केली. 


सूर्यकुमार यादवची शानदार फलंदाजी - 


मिस्टर 360 सूर्यकुमार यादव यानं 47 धावांची झंझावाती फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. पण त्यानं आपले काम चोख बजावले. सूर्यकुमार यादवने रोहित शर्मासोबत 73 धावांची भागिदारी करत टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. सूर्यकुमार यादवने दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव याने मधल्या षटकात टीम इंडियाची धावसंख्या वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली. 


हार्दिकची छोटेखानी पण महत्वाची खेळी - 


हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करता टीम इंडियाची धावसंख्या वेगाने वाढवली. हार्दिक पांड्याने 13 चेंडूमध्ये 3 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक चौकार आणि दोन षटकाराचा समावेश होता. 






जड्डूचा फिनिशिंग टच 


रवींद्र जाडेजाने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत टीम इंडियाची धावसंख्या वाढवली. रवींद्र जाडेजाने अक्षर पटेलच्या साथीने भारताची धावसंख्या वाढवली. अक्षर पटेलने सहा चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. तर रवींद्र जाडेजाने 9 चेंडूमध्ये दोन चौकाराच्या मदतीने 17 धावांची झंझावती खेळी केली. 


विराट कोहली - पंत, दुबे फ्लॉप -  


विराट कोहलीला उपांत्य सामन्यातही मोठी खेळी करता आलेली नाही. टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात विराट कोहली पहिल्यांदाच फ्लॉप गेलाय. विराट कोहली फक्त 9 धावा काढून तंबूत परतला. विराट कोहलीने 9 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने नऊ धावा केल्या.  रीस टोप्लीने विराट कोहलीला बाद केले. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीला 100 धावाही करता आलेल्या नाहीत, त्याची सर्वोच्च धावसंख्या 37 इतकी आहे. 


विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यालाही आज आपला प्रभाव पाडता आला नाही. ऋषभ पंत याला सहा चेंडूमध्ये फक्त 4 धावा काढता आल्या. सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात पंत बाद झाला. 


शिवम दुबे पुन्हा एकदा फेल ठरला. दुबेला भोपळाही फोडता आला नाही. ख्रिस जॉर्डनने दुबेला पहिल्याच चेंडूवर बटलरकरवी झेलबाद केले. 


इंग्लंडची गोलंदाजी कशी राहिली ?


इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. रीस टोप्ली, जोफ्रा अर्चर,  सॅम करन आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.


टीम इंडियाची प्लेईंग 11 -


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह. 


इंग्लंडची प्लेईंग 11 - 


फिलिप साल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, मोइन अली, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, रीस टॉपले