IND vs ENG: इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्यानं धावांचा पाऊस पाडत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आता तो क्रिकेटमधील महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडू शकतो. जो रूटला द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सध्या सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) , सचिन तेंडुलकर आणि जो रूटचं नाव आहे.  


सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करचा विक्रम मोडण्याची संधी
भारताविरुद्ध कसोटी सामन्यात जो रूटनं 43 डावात आतापर्यंत 2353 धावा केल्या आहेत. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर जो रूटच्या पुढं आहेत. सचिन तेंडुलकरला मागं टाकण्यासाठी त्याला भारताविरुद्ध कसोटी सामन्यात 184 धावांची कराव्या लागतील. तर, 131 धावा केल्यानंतर सुनील मागं टाकेल. याचबरोबर 79 धावांचा आकडा गाठताच तो आपला सहकारी खेळाडू कूकलाही मागे टाकेल. महत्वाचं म्हणजे, जो रूट ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यावरून तो भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो, असे मानले जात आहे.


1 जुलैपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटची कसोटी 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळवली जाणार आहे. सध्या या मालिकेत भारतीय संघ 2-1 नं पुढे आहे. भारतीय संघ शेवटचा सामना जिंकण्यात किंवा अनिर्णित राहण्यात यशस्वी ठरला तर मालिका आपल्या नावावर होईल. 2007 साली इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात भारतीय संघाला अखेरचे यश मिळालं होतं. तेव्हापासून भारतानं इंग्लंडविरुद्ध त्यांच्या मायभूमीत एकही मालिका जिंकलेली नाही. अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून इतिहस रचण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. 


हे देखील वाचा-