IND vs ENG : मँचेस्टरमध्ये 7 मॅचमध्ये 35 विकेट, इंग्लंडचा 'तो' गोलंदाज भारतासाठी धोकादायक ठरणार? टीम इंडियाचा मार्ग खडतर

Team India : टीम इंडिया चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. भारतापुढं इंग्लंडच्या ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीचं आव्हान असेल.

Continues below advertisement

मँचेस्टर : शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी उद्या मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर सुरु होणार आहे. भारताचा या कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल. शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाला खेळाडू जखमी असल्यानं धक्के बसले आहेत. नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप हे दुखापतग्रस्त झाल्यानं चौथ्या कसोटीतून बाहेर गेले आहेत. मँचेस्टर कसोटीत टीम इंडियापुढं इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर पेक्षा धोका वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याचा असेल. ख्रिस वोक्स याची या मैदानावरील कामगिरी फलंदाजांना धडकी भरवणारी आहे. 

Continues below advertisement

ख्रिस वोक्सचं मँचेस्टरवरील रेकॉर्ड 

ख्रिस वोक्सला भारताविरुद्धच्या मालिकेत यश मिळालेलं नाही. ख्रिस वोक्सनं तीन कसोटीमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. यापर्वीचं मँचेस्टर येथील ख्रिस वोक्सचं रेकॉर्ड शुभमन गिलचं टेन्शन वाढवणारं ठरणार आहे. ख्रिस वोक्सनं या मैदानावर 7 कसोटी खेळलेल्या आहेत. यामध्ये त्यानं 35 विकेट घेतल्या आहेत.  ख्रिस वोक्सनं या मैदानावर 2 मॅचमध्ये प्रत्येकी 5 विकेट घेतल्या आहेत. तर, एका मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या होता. या मैदानावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ख्रिस वोक्स चौथ्या स्थानावर आहे.  

टीम इंडिया मँचेस्टर कसोटीमध्ये विजय मिळवून जुना इतिहास पुसण्याचा प्रयत्न करेल. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-2 नं पिछाडीवर आहे. भारतानं या मालिकेत बर्मिंघम कसोटीत विजय मिळवला होता. त्या मैदानावर भारतानं त्यापूर्वी विजय मिळवलेला नव्हता. त्याच प्रकारची कामगिरी शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियाला मँचेस्टर कसोटीत करावी लागेल. मँचेस्टर कसोटीत विजय मिळवणं भारतासाठी आव्हानात्मक असेल. 

इंग्लंडचा संघ जाहीर 

इंग्लंडनं चौथ्या कसोटीत संघात बदल केला आहे. भारताविरूद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडनं शोएब बशीरच्या जागेवर लियाम डॉसन याला संधी दिली आहे. शोएब बशीर दुखापतग्रस्त झाल्यानं संघाबाहेर गेला आहे. लियाम डॉसननं भारताविरुद्ध पदार्पण केलं होतं. मात्र, बराच काळ तो संघाबाहेर होता.  

इंग्लंडचा संघ :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.

संघ निवडीचं शुभमन गिलसमोर आव्हान

टीम इंडियाचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. याशिवाय रिषभ पंतच्या बोटाला देखील दुखापत झालेली आहे. यामुळं मँचेस्टर कसोटीत संघ निवडण्याचं आव्हान शुभमन गिलसमोर असेल. जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार असल्याचं मोहम्मद सिराजनं सांगितलं आहे. त्यामुळं करुण नायरला पुन्हा संधी मिळणार का? नितीश कुमार रेड्डीच्या जागेवर संघात कोण खेळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 
 
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola