England vs India 4th Test : इंग्लंड विरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात मिळालेल्या लाजिवारण्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आज सुरु होणारा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लडं यांच्यातील चौथा कसोटी सामना ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, ओव्हलवर इंग्लंडच्या विरोधात टीम इंडियाचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. अशात विराटसेनेसाठी या मैदनावर विजय मिळवणं एक मोठं आव्हान ठरणार आहे.
भारताला आतापर्यंत ओव्हल मैदानावर केवळ एकच विजय मिळाला आहे. तो म्हणजे, 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये मिळालेला विजय. भारताने या मैदानावर आतापर्यंत 13 कसोटी सामने खळले आहेत. ज्यापैकी 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सात सामने ड्रॉ झाले आहेत.
द ओव्हलचा पिच इंग्लंडमध्ये फलंदाजीसाठी उत्तम आहे आणि भारतीय फलंदाजांसाठी ही आनंदाजी बाब आहे. गेल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघातील फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक पाहायला मिळाली. धावांचा डोंगर रचण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय फलंदाजांसाठी ओव्हल मैदानावरील पिच पर्वणी ठरु शकतो. दरम्यान, टीम इंडियाकडून चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांकडून फारशी उत्तम खेळी होताना दिसत नाही.
भारतीय संघ व्यवस्थापनाला ज्या पाच गोलंदाजांना खेळवायचे आहे, त्यामध्ये कदाचित फलंदाजांची फळी मजबूत करण्यासाठी ऑलराउंडर शार्दुल ठाकूरचा समावेश होऊ शकतो. तसेच रविंद्र जाडेजाच्या फिटनेसबाबत अद्याप कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आजच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. अशातच रवींद्र जाडेजाऐवजी संघात आर, अश्विनला स्थान मिळू शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. चौथ्या कसोटीसाठी बीसीसीआयनं नुकतंच इंग्लंडच्या संघासोबतच्या आगामी चौथ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला. संघात नेमका कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याचा उलगडा बीसीसायकडून ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. चौथ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यात सहा विकेट घेतले आहे. या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेट आपल्या डेब्यू सामन्यात चार विकेट घेतले होते.
इंग्लंडला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण जो बटलर चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे विकेटकीपिंगची जबाबदारी जॉनी बेयरस्टो सांभाळणार आहे. त्यासोबतच मोइन अली उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
दरम्यान, यजमान संघ जेम्स एंडरसन आणि ओली रॉबिंसन यादोघांपैकी कोणाला आराम देतो की, नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण दोन्ही वेगवान गोलंदाजांनी पहिले तीन कसोटी सामने खेळले आहेत. तसेच कसोटी मालिकेत आतापर्यंत अनेक ओव्हर्ससाठी गोलंदाजी केली आहे.
भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने झाले असून दोन्ही संघानं एक-एक सामना जिंकला आहे. तर पहिला सामना अनिर्णित झाला होता.