India vs England 4th T20 Playing XI : राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला 171 च्या धावसंख्येवर रोखले. यानंतर संघ 20 षटकांत 9 बाद 145 धावाच करू शकला. त्यामुळे टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गेल्या दोन सामन्यांमध्येही भारताची फलंदाजी चिंतेचा विषय राहिली आहे. दुसऱ्या टी-20 मध्येही संघाला अडचणींचा सामना करावा लागला, जेव्हा टॉप ऑर्डर कोसळली पण तेव्हा तिलक वर्मा एकटा नडला आणि भारताला विजय मिळवून दिला.
चौथ्या सामन्याचा थरार रंगणार पुण्यात
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने राजकोटमध्ये विजय मिळवून टी-20 मालिका रोमांचक केली आहे. तिसऱ्या सामन्यातच भारताला मालिका जिंकण्याची उत्तम संधी होती, पण त्यांनी ती हुकून दिली. त्यामुळे आता चौथ्या टी-20 मध्ये विजय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल आणि या सामन्यात भारतीय संघात काही मोठे बदल दिसून येतील.
तिसऱ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली होती, परंतु काही काळापासून टी-20 मध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज राहिलेला अर्शदीप अंतिम इलेव्हनमध्ये परतण्याची शक्यता आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने अर्शदीपच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली, पण अर्शदीप शमीची जागा घेण्याची शक्यता कमी आहे. चांगल्या फॉर्ममध्ये नसलेल्या रवी बिश्नोईच्या जागी अर्शदीप परतू शकतो.
हार्दिक आणि जुरेल होणार बाहेर?
दुसरीकडे, हार्दिक पांड्याने तीन सामने खेळले आहेत. त्यामुळे संघ त्याला उर्वरित सामन्यांसाठी विश्रांती देऊ शकतो. जेणेकरून तो एकदिवसीय मालिका आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिट राहील. हार्दिकच्या जागी शिवम दुबेचा प्लेइंग- 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळू न शकलेल्या रिंकू सिंगचेही संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेलला संघाबाहेर राहावे लागेल.
चौथ्या टी-20 साठी अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
हे ही वाचा -