Hardik Pandya ICC T20I Rankings latest : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान संघाला तिसऱ्या सामन्यात 26 धावांनी पराभव पत्करावा लागला. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि इंग्लंडला 171 वर रोखले. पण, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि त्यांचा डाव 145 वर संपुष्टात आला. या सामन्यात भारताची संपूर्ण फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. सामन्यानंतर संघातील खेळाडूंवर टीका होत आहे.
धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने 35 चेंडूत 40 धावांची खेळी केली. यानंतर माजी भारतीय यष्टीरक्षक पार्थिव पटेलने हार्दिकच्या संथ सुरुवातीवर टीका केली. स्टार स्पोर्ट्सच्या सामन्यानंतरच्या कार्यक्रमात पार्थिव म्हणाला, "टी-20 मध्ये सेट होण्यासाठी 20-25 चेंडू लागायला नकोत.हार्दिकने 35 चेंडूत 40 धावा केल्या असतील, पण त्याच्या डावाच्या सुरुवातीला बरेच डॉट बॉल होते.
पण सामना संपल्यानंतर अवघ्या 12 तासांतच त्याच्यावर टीका करणारे आता टाळ्या वाजवत आहे. कारण टीम इंडियाचा हा अष्टपैलू खेळाडू नंबर 1 बनला आहे. बुधवारी आयसीसीने ताज्या क्रमवारी जाहीर केल्या ज्यामध्ये हार्दिक पांड्या जगातील नंबर 1 टी-20 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. हार्दिक पांड्या 255 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
हार्दिक पांड्याची कारकीर्द
हार्दिक पांड्या सध्या फक्त टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट खेळतो. त्याच्या शरीराला दुखापत होण्याची शक्यता असते त्यामुळे तो लहान स्वरूपाच्या क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रित करतो. या खेळाडूच्या टी-20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिकने 112 टी-20 सामन्यांमध्ये 27.77 च्या सरासरीने 1750 धावा केल्या आहेत. पांड्याचा स्ट्राईक रेट 140 पेक्षा जास्त आहे. या खेळाडूने गोलंदाजीत 94 बळी घेण्यात यश मिळवले आहे. पांड्या फलंदाजी आणि चेंडू दोन्हीकडून उत्तम कामगिरी करत आहे हे स्पष्ट आहे. गेल्या वर्षी, या खेळाडूने टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
तिलक वर्मा-वरुण चक्रवर्तीचा ही धमाका
तिलक वर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनीही आयसीसी टी-20 क्रमवारीत उत्तम कामगिरी केली आहे. तिलक वर्मा इंग्लंडच्या फिल साल्टला मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे, गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्तीला टॉप-5 मध्ये स्थान मिळवले आहे. तिलक वर्माने दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले होते, तर वरुण चक्रवर्तीने मालिकेत 3 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. आता मालिकेतील चौथा सामना ३१ जानेवारी रोजी पुण्यात खेळला जाईल. टीम इंडियाला पुन्हा एकदा मालिका जिंकण्याची संधी असेल.