IND vs ENG 3rd Test: राजकोट कसोटी सामन्यात भारताने साहेबांचा 434 धावांनी दारुण (IND vs ENG) पराभव केला. भारताच्या कसोटी इतिहिसातील हा सर्वात मोठा विजय होय. तिसऱ्या सामन्यातील या विजयासह भारताने पाच सामन्याच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. राजकोट कसोटी सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रविंद्र जाडेजाला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले. भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर तिसऱ्या कसोटी सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. पण या विजयाचे सहा प्रमुख शिलेदार आहेत. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने हा विराट विजय मिळवलाय.
रवींद्र जाडेजा -
अष्टपैलू खेळी करणाऱ्या रवींद्र जाडेजाला सामनावीर पुरस्कारनं गौरवण्यात आले. पहिल्या डावात भारताची अवस्था 3 बाद 33 अशी झाली होती. त्यावेळी रवींद्र जाडेजानं कर्णधार रोहित शर्माला संयमी साथ देत भारताच्या डावाला आकार दिला. पहिल्या डावात रवींद्र जाडेजानं 225 चेंडूमध्ये 112 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. त्याशिवाय गोलंदाजीत जाडेजानं दोन फलंदजांना माघारी धाडलं. त्याशिवाय दुसऱ्या डावात जाडेजानं पाच विकेट घेतल्या. रवींद्र जाडेजानं तिसऱ्या कसोटी सामन्यात एक शतक आणि सात विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.
यशस्वी जायस्वाल -
पहिल्या डावात अपयशी ठरणाऱ्या यशस्वी जायस्वाल यानं दुसऱ्या डावात द्विशतकी धमाका केला. यशस्वी जायस्वाल यानं 12 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीनं नाबाद 214 धावांची खेळी केली. यशस्वीच्या द्विशतकाच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात 430 धावांचा डोंगर उभारला. यशस्वी जायस्वालनं सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतकी खेळी केली. दुखापतग्रस्त असताना यशस्वी जायस्वाल यानं शानदार द्विशतक ठोकलं.
रोहित शर्मा -
रोहित शर्मानं नेतृत्व करताना शानदार कामगिरी केलीच. त्याशिवाय फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं. पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळल्यानंतर रोहित शर्मानं अनुभव पणाला लावत भारताच्या डावाला आकार दिला. भारताने 33 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी रोहित शर्मानं रवींद्र जाडेजाला साथीला घेत भारताच्या डावाला आकार दिला. रोहित शर्मान जाडेजासोबत द्विशतकी भागिदारी करत भारताची धावसंख्या वाढवली. रोहित शर्मानं पहिल्या डावात 131 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षठकार आणि 14 चौकारांचा समावेश होता.
सरफराज खान -
पदार्पण करणाऱ्या सरफराज खान यानं सर्वांचीच मनं जिंकली. पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात त्यानं अर्धशतकं ठोकली. सरफराज खान यानं पहिल्या डावात 62 धावांची खेळी केली. तो दुर्वैवी धावबाद झाला, पण त्याच्या इम्पॅक्ट खेळीनं भारताची धावसंख्या 400 पार केली. त्याशिवाय दुसऱ्या डावात त्यानं नाबाद 68 धावांचा पाऊस पाडला. सरफराज खान यानं दोन्ही डावात वनडे स्टाईल फलंदाजी केली.
शुभमन गिल -
राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात शुभमन गिल याला खातेही उघडता आले नाही.पण दुसऱ्या डावात त्यानं कसर भरुन काढली. शुभमन गिल यानं दुसऱ्या डावात 91 धावांची खेळी केली. शुभमन गिल शतक करणार असेच वाटत होते. पण तो दुर्वैरित्या धावबाद झाला. त्याचं शतक 9 धावांनी हुकलं.
मोहम्मद सिराज -
पहिल्या डावात मोहम्मद सिराज यानं प्रभावी मारा केला. सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळेच भारताला पहिल्या डावात 126 धावांची आघाडी घेता आली. सिराज यानं पहिल्या डावात चार फलंदाजांना माघारी धाडलं.