IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड राजकोट कसोटीच्या चौथ्या दिवशी (IND vs ENG 3rd Test) यशस्वी जैस्वाल यानं द्विशतक झळकावलं. अवघ्या सातव्या कसोटी सामन्यात यशस्वी जायस्वाल यानं दुसरं द्विशतक ठोकले आहे. याआधी इंग्लंडविरोधातच विशाखापट्टनम कसोटी सामन्यात यशस्वी जायस्वाल यानं 209 धावांची खेळी केली होती. आज पुन्हा एकदा यशस्वी जायस्वाल यानं शानदार खेळी केली. यशस्वी जायस्वाल यानं 231 चेंडूमध्ये द्विशतक ठोकलं. यशस्वी जायस्वालच्या द्विशतकाच्या बळावर राजकोट कसोटीमध्ये भारताकडे 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी झाली आहे.
तिसऱ्या दिवशी यशस्वी जायस्वाल यानं शतक ठोकलं होतं. पण दुखापतीमुळे त्याला मैदान अर्ध्यावर सोडावं लागलं होतं. आज तो पुन्हा एकदा मैदानावर परतला आणि टीम इंडियासाठी धावांचा पाऊस पाडला. यशस्वी जायस्वाल यानं लागोपाठच्या दोन सामन्यात दोन द्विशतक ठोकली. यशस्वी जायस्वाल यानं 233 चेंडूमध्ये 212 धावांवर खेळत आहे. यामध्ये 12 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश आहे. यशस्वी जायस्वाल यानं सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली.
शुभमन गिल नर्वस 90 चा शिकार -
तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर शुभमन गिल यानं यशस्वीच्या साथीनं भारताच्या डावाला आकार दिला. एकीकडे यशस्वी जायस्वाल वादळी फलंदाजी करत होता, दुसरीकडे शुभमन गिल संयमी फलंदाजी केली. शुभमन गिल यानं चौथ्या दिवशीही आपल्या शैलीतच फलंदाजी केली. शुभमन गिल याने चौथ्या दिवशी शतकाकडे वाटचाल केली, पण दुर्देवीरित्या धावबाद झाला. शुभमन गिल 91 धावांवर बाद झाला. 9 धावांनी त्याचं शतक हुकलं.
सरफराज खानची फटकेबाजी -
सरफराज खान याने आक्रमक फलंदाजी करत यशस्वीला साथ दिली. दोघांनीही झटपट धावा काढल्या. सरफराज खान यानं लागोपाठ दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले. सरफराज खान 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 68 धावांवर खेळत आहे.
500 पेक्षा जास्त धावांची आघाडी
दुसऱ्या डावात भारताने 430 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावातील 126 धावांच्या आघीडमुळे भारताकडे 556 धावांची आघाडी झाली आहे. इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचे आव्हान असेल. दीड दिवसांमध्ये बॅझबॉल खेळणाऱ्या इंग्लंडपुढे तगडं आव्हान असेल. यशस्वी जायस्वालच्या शतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या कसोटीवर वर्चस्व मिळवलं आहे.
आणखी वाचा
कुलदीपच्या चुकीचा फटका 'प्रिन्स'ला, शतकाजवळ जाऊन धावबाद, शुभमनला राग अनावर VIDEO