IND vs ENG, 1st ODI, The Oval Stadium: इंग्लंडमधील लंडन येथील केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये सर्वबाद केलं आहे. यावेळी जसप्रती बुमराह याने तब्बल सहा इंग्लंडचे गडी तंबूत धाडत कमाल कामगिरी केली आहे. आता भारताला 50 षटकात 111 धावा करायच्या आहेत.
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पार पडत असून सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अगदी योग्य ठरवत सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. यावेळी बुमराहने अप्रतिम अशी 7.2 ओव्हरमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. तर शमीने 3 आणि युवा प्रसिध कृष्णाने एक विकेट घेतली. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आलेली नाही. जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या.
शमीचा नवा रेकॉर्ड
सामन्यात मोहम्मद शमी याने एका दमदार रेकॉर्डला गवसणी देखील घातली आहे. शमीने सामन्यात तिसरा विकेट घेताच 150 एकदिवसीय विकेट्स पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे शमीने अगदी जलदगतीने हे विकेट्स पूर्ण करत जलदगतीने 150 एकदिवसीय विकेट पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खानसोबत शमी तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. दोघांनीही 80 सामन्यांत ही कामगिरी करुन दाखवली आहे.
हे देखील वाचा-