बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची 6 बाद 144 धावा अशी बिकट अवस्था झाली असताना रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या गड्यासाठी नाबाद 195 धावांची जबरदस्त भागीदारी केली. या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर शानदार पुनरागमन करताना 80 षटकांत 6 बाद 339 धावा काढत दमदार वाटचाल केली.


बांगलादेशचा (Ind vs Ban) वेगवान गोलंदाज हसन महमूदने (Hasan Mahmud) भारताला पहिले चार धक्के दिले. हसन महमूदने रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि ऋषभ पंतला बाद केले. नवीन चेंडूवर स्विंग मिळवणाऱ्या हसन महमूदने भारतीय फलंदाजांची शाळा घेतली. त्यामुळे भारतीय संघाची कमजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिलची नेमकी कुठे चूक झाली?, जाणून घ्या...






1. रोहित शर्माच्या संथ सुरुवातीवर प्रश्न


अलीकडच्या काळात रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याची संथ सुरुवात हा संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. या सामन्यातही रोहितने सावध फलंदाजी करत खेळपट्टीवर वेळ घालवला, मात्र धावगती संथ राहिली. गेल्या दोन वर्षांपासून त्याचा कसोटी क्रिकेटमधील स्ट्राइक रेट 60 च्या आसपास आहे, जो आजच्या वेगवान खेळात थोडा कमी मानला जातो. रोहितने थोडा अधिक आक्रमक खेळ केला असता तर कदाचित भारताला चांगली सुरुवात करता आली असती.


2. शुभमन गिलचा संयम नसणे


शुभमन गिल हा भारताच्या कसोटी क्रिकेटचा पुढील स्टार मानला जात आहे, पण या सामन्यात संघाला त्याची गरज असताना त्याने विकेट गमावली. गिलने अनावश्यक फटका खेळून आपली विकेट गमावली, यावरून त्याचा अनुभव आणि संयमाचा अभाव दिसून येतो. गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अधिक संयम दाखवण्याची गरज होती. 


3. विराट कोहलीला जुनी कमजोरी पुन्हा नडली-


विराट कोहलीची कारकीर्द भलेही चांगली असेल, पण हसन महमूदच्या विरोधात त्याची एक जुनी कमजोरी पुन्हा समोर आली. कोहली अनेकदा ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूंवर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करताना त्याची विकेट गमावतो. या सामन्यातही असेच घडले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही ही समस्या त्याच्यासाठी अडचणीची ठरू शकते. कोहलीला त्याच्या या जुन्या कमकुवतपणाकडे लक्ष द्यावे लागेल जेणेकरून तो पुन्हा लय मिळवू शकेल.


संबंधित बातमी:


Ind vs Ban: टीम इंडियाला चुणूक लागलेली, विशेष सरावही केला; पण तो आला अन् कहर माजवला, कोण आहे हसन महमूद?