Ind vs Ban Test Match: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत खेळली जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर भारताने 6 विकेट्स गमावत 339 धावा केल्या. रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या फलंदाजी करत आहे.
बांगलादेशने (Ind vs Ban) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. मात्र बांगलादेशचा कर्णधार शांतोचा हा निर्णय अगदी योग्य असल्याचे सुरुवातीच्या दोन तासांतच दिसून आले. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने (Hasan Mahmud) भारताला पहिले चार धक्के दिले. हसन महमूदने रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), शुभमन गिल आणि ऋषभ पंतला बाद केले. नवीन चेंडूवर स्विंग मिळवणाऱ्या हसन महमूदने भारतीय फलंदाजांची शाळा घेतली. विशेष म्हणजे मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाने हसम महमूदविरुद्ध कशी फलंदाजी करावी, यासाठी खास गोलंदाज आणत भारतीय संघाने सराव केला होता. मात्र यानंतर देखील भारतीय फलंदाजांना अपयश आले.
कोण आहे हसन महमूद? (Who Is Hasan Mahmud)
हसन महमूद हा वेगवान गोलंदाज आहे जो बांगलादेशसाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. 2020 मध्ये हसन महमूदने बांगलादेशकडून टी-20 द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये हसन महमूदला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2024 मध्ये त्याचे नशीब उघडले आणि त्याला कसोटी क्रिकेटमध्ये देखील पदार्पण करण्याची संधी मिळाली. महमूदने एप्रिल 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. यानंतर हसन महमूदला पाकिस्तान दौऱ्याची संधी मिळाली. आता तो भारताविरुद्ध कारकिर्दीतील चौथी कसोटी खेळत आहे.
हसन महमूदची कारकीर्द-
हसन महमूदने आतापर्यंत 3 कसोटी, 22 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 6 डावात 25.00 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीच्या 21 डावांमध्ये 32.10 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या. उर्वरित टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 25.77 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. हसन महमूद त्याच्या अचूकतेसाठी प्रसिद्ध आहे. जुन्या चेंडूबरोबरच नवीन चेंडूवरही चमत्कार करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
रवीचंद्रन अश्वीनचं दमदार शतक-
भारताची 6 बाद 144 धावा अशी बिकट अवस्था झाली असताना रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या गड्यासाठी नाबाद 195 धावांची जबरदस्त भागीदारी केली. या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर शानदार पुनरागमन करताना 80 षटकांत 6 बाद 339 धावा काढत दमदार वाटचाल केली. अश्विनने 112 चेंडूंत 10 चौकार व 2 षट्कारांसह नाबाद 102, जडेजाने 117 चेंडूंत 10 चौकार व 2 षट्कारांसह नाबाद 86 धावा केल्या आहेत.