India vs Bangladesh 1st Test Day-1 : पाकिस्तानमध्ये छाप पाडल्यानंतर बांगलादेशचा संघ भारतात आला आहे आणि टीम इंडियाविरुद्ध चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात आपला दम दाखवला. चेन्नई कसोटीचा आज पहिला दिवस असून त्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. नजुमलचा हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला. पहिल्याच दिवशी बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज हसन महमूदने आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. हसन महमूदने सकाळी रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिलसारख्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. 


भारतीय संघातील दिग्गज खेळाडूसाठी कठीण दिसणाऱ्या चेन्नईतील या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन संकटमोचन ठरला, त्याने तूफानी शैलीत फलंदाजी करून अर्धशतक ठोकले. घरच्या मैदानावर खेळताना अश्विनने 58 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ज्यामध्ये अश्विनने आतापर्यंत सहा चौकार आणि एक षटकार मारला आहे. अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक पूर्ण केले. अश्विन आणि जडेजा यांनी मिळून भारतीय डाव सांभाळला आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली आहे.






अश्विन जेव्हा क्रीझवर आला, तेव्हा टीम इंडियाने 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र अश्विनने क्रीजवर येऊन बांगलादेशवर दडपण आणले. येताच त्याने शानदार फटकेबाजी सुरू केली. त्याचे फटके पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही चकित झाले. अश्विनला रवींद्र जडेजाचीही चांगली साथ मिळाली. अश्विनने जडेजासोबत झटपट शतकी भागीदारी केली आणि यादरम्यान अश्विनने अवघ्या 58 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.


अश्विनला जडेजानेही चांगली साथ दिली आणि लवकरच संघाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे गेली. दोघांनी मिळून सातव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी करताना 24 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता, ज्यांनी 2000 मध्ये ढाका कसोटी सामन्यात 121 धावांची भागीदारी केली होती, जी आता अश्विनच्या नावावर आहे. जडेजा जोडीने मागे सोडले आहे.