IND vs BAN 1st ODI:  पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं भारताचा एक विकेट आणि चार षटकं राखून पराभव केला. केएल राहुलच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना फक्त 186 धावा केल्या. राहुलचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने पाच विकेट्स घेतल्या. भारताने दिलेले 187 धावांचे आव्हान पार करताना बांगलादेशची अवस्था बिकट झाली होती. पण मेंहदी हसन आणि मुस्तफिजूर यांनी दहाव्या विकेट्ससाठी अर्धशतकी भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला. विजय दृष्टीक्षेपात होता, तरिही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कोणत्या गोष्टीमुळे टीम इंडियाचा पराभव झाला नाही, पाहूयात भारताच्या पराभवाची कारणं..


खराब क्षेत्ररक्षण -


भारताच्या खेळाडूंनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात अतिशय खराब क्षेत्ररक्षण केलेय. विकेटकिपर केएल राहुलनं सर्वाधिक निराश केले. राहुलनं मेंहदी हसन मिराज याचा अतिशय सोपा झेल सोडला, ही बांगलादेशची अखेरची जोडी होती. पण राहुलनं जिवनदान देत बांगलादेशला विजयाची संधी दिली. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदर यानेही एक झेल सोडला. त्याशिवाय सीमारेषावर खराब क्षेत्ररक्षण झाल्यामुळे विनाकारण चौकार गेले. एका धावेच्या ठिकाणी दोन धावा दिल्या... कमी धावसंख्या असताना भारतीय खेळाडूंनी गचाळ क्षेत्ररक्षण केलं. हे भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं..


दिशाहीन गोलंदाजी -


सुरुवातीला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकात दिशाहीन मारा केला. कुलदीप सेन आणि दीपक चाहर यांच्या गोलंदाजीवर बागंलादेशच्या फलंदाजांनी सहज धावा काढल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनाही अखेरची जोडी फोडता आली नाही.


भारताच्या फलंदाजांची खराब कामगिरी -


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराश केले. केएल राहुलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर याच्यासह इतर फंलदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय संघाचा डाव 41.2 षटकात 186 धावांवर संपुष्टात आला. 


मेंहदी हसन मिराजने बाजी पलटवली -


भारताने दिलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची अवस्थाही बिकट झाली होती. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतले होते. आठव्या क्रमांकावर आलेल्या मेंहदी हसन याने आक्रमक फलंदाजी करत बाजी पलटवली.


लिट्टन दास आणि शाकिबची भागिदारी -


कर्णधार लिट्टन दास आणि अष्टपैलू शाकिब अल हसन यांनी मोक्याच्या क्षणी भागिदारी करत विजयाचा पाया रचला. लिटन दासने 41 धावांची खेळी केली. लिट्टन दास याने शाकिबसोबत भागिदारी करत बांगलादेशचा डाव संभाळला.