IND vs BAN : कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात तसंच कॅच सुटल्यावर सामनाही हातातून निसटतो, याचा प्रत्यय आज भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आला. बांगलादेशने अवघ्या एका विकेटने सामना जिंकला. पण 9 विकेट गेले असताना बांगलादेशच्या फलंदाजांचा झेल भारताच्या केएल राहुलनं सोडला आणि हेच भारताच्या पराभवाचे मोठे कारण ठरले. सामन्यात आधी गोलंदाजी कर अवघ्या 186 धावांत भारतीय संघाला बांगलादेशनं सर्वबाद केलं. स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) 5 विकेट्स घेतल्या, भारताकडून राहुलने 73 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीतही बांगलादेशने आधी चांगली कामगिरी केली पण 136 धावांवर त्यांचे 9 गडी बाद झाले असताना सामना ते जिंकतील असं वाटत होतं, पण तेव्हाच मेहदी हसननं मुस्तफिजूरसोबत अर्धशतकी भागिदारी करत सामना बांगलादेशला जिंकवून दिला.






नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर गोलंदाजांनी सुरुवातही चांगली केली. सलामीवीर शिखर आणि रोहित अनुक्रमे 7 आणि 27 धावा करुन बाद झाले. विराटही 9 धावा करुन तंबूत परतला. श्रेयस आणि केएल यांनी काही काळ डाव सावरला. पण श्रेयस 24 धावा करुन बाद झाला. मग वॉशिंग्टन सुंदरही 19 धावा करुन तंबूत परतला. केएल राहुलने एकहाती झुंज कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या 73 धावांच्या जोरावर भारत 186 धावांपर्यंत पोहचू शकला. राहुलने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या. तर बांगलादेशकडून स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसन याने महत्त्वपूर्ण असे 5 विकेट्स घेत कमाल गोलंदाजी केली. ए. हुसेन यानेही तब्बल 4 विकेट्स घेतले, तर मेहिदी मिराजने एक गडी बाद केला.


187 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशने पहिल्या चेंडूवर विकेट गमावली. पण नंतर कर्णधार लिटन दासच्या 41 धावांच्या जोरावर त्यांनी डाव सावरला. दासला अनमूल (14) आणि शाकिब (29) यांची साथ मिळाली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत एक-एक करत बांगलादेशच्या फलंदाजांना तंबूत धाडण्यास सुरुवात केली. 39.3 ओव्हरमध्ये 136 धावांवर बांगलादेशचे 9 गडी तंबूत परतले. त्यानंतर भारत सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. पण तेव्हाच मेहदी हसननं मुस्तफिजूरसोबत अर्धशतकी भागिदारी करत सामना बांगलादेशला जिंकवून दिला. मेहदीनं नाबाद 38 आणि रेहमाननं नाबाद 10 धावा केल्या. विशेष म्हणजे मेहदी 15 धावांवर असताना तो झेलबाद होणार होता. पण केएल राहुलनं त्याचा सोपा झेल सोडला आणि सामना गमावण्यात हेच मोठं कारण ठरलं.  


हे देखील वाचा-