IND vs AUS Final 2023 Winner : क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (Cricket World Cup Final) पूर्णपणे वर्चस्व गाजवत टीम इंडियाला (Team India) पराभवाची धूळ चारणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा (Australia) कर्णधार पॅट कमिन्स याने आमच्या संघाने सर्वोत्तम खेळ फायनलसाठी राखून ठेवला होता, असे म्हटले. सामना संपल्यानंतर पॅट कमिन्सने (Pat Cummins) आपली विजयाबाबतची प्रतिक्रिया व्यक्त केली,. 


टीम इंडियाने दिलेले 241 धावांचे लक्ष्य 7 षटके आणि सहा गडी राखून ऑस्ट्रेलियाने पार केले. ट्रॅव्हिस हेडने 137 धावांची झुंजार खेळी केली. तर,  मार्नस लॅबुशेनने 110 चेंडूत नाबाद 58 धावा करत त्याला मोलाची साथ दिली. या दोघांच्या भागिदारीने ऑस्ट्रेलियाने सामना आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवला. कमिन्सने त्यांचे कौतुक करताना म्हटले की, मार्नसने अतिशय शांत डोक्याने फलंदाजी केली. तर, ट्रॅव्हिस हेडने सगळ्यात मोठ्या सामन्यात आपला खेळ दाखवून दिला. या खेळाडूंनी निवड समितीने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ केला असल्याचे कमिन्सने म्हटले. 


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय आश्चर्यजनक वाटत होता. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपली चोख भूमिका बजावली आणि भारताचा डाव 240 धावांवर रोखला. 


कमिन्सने म्हटले की, खेळपट्टी अपेक्षेपेक्षा हळूवार होती.  विशेषत: आम्ही विचार केला तितके चेंडू फिरत नव्हते. प्रत्येकाने चांगले जुळवून घेतले आणि काही चांगली गोलंदाजी केली असल्याचे त्याने सांगितले. “मला वाटले की त्या विकेटवर 300 धावा करणे कठीण असले तरी ते साध्य करता येईल हा विश्वास होता. आम्ही 240 धावांवर भारताला रोखले ही आनंदाची बाब होती, असेही त्यांनी म्हटले. 


ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध या वर्षी जुलैमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर आता विश्वचषकही जिंकल्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार  कमिन्सने सांगितले की, हा विजय म्हणजे यशाचे शिखर आहे. हे वर्ष प्रदीर्घ काळासाठी लक्षात राहील असेही त्याने म्हटले. 


कांगारू सहाव्यांदा विश्वचषक विजयी 


अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने पराभव करत सहाव्यांदा चषकावर नाव कोरले. ट्रेविस हेडचं झंझावती शतक आणि लाबुशनेचं संयमी अर्धशतकामुळे भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले. भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियानं याआधी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे.