IND vs AUS Final 2023 Winner : नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने पराभव करत सहाव्यांदा चषकावर नाव कोरले. ट्रेविस हेडचं झंझावती शतक आणि लाबुशनेचं संयमी अर्धशतकामुळे भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले. भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियानं याआधी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. 


भारताने दिलेल्या 241 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वादळी सुरुवात केली. डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी पहिल्याच षटकात 15 धावा वसूल करत इरादे स्पष्ट केले होते. पण मोहम्मद शामीने दुसऱ्याच षटकात डेविड वॉर्नरचा अडथळा दूर केला. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्शही फार काळ तग धरु शकला नाही. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श याचा अडथळा दूर केला. मिचेल मार्शने 15 चेंडूत 15 धावा केल्या. त्याने या छोटेखानी खेळीत एक चौकार आणि एक षटाकर ठोकला. स्टिव्ह स्मिथ याला लौकिकास साजेशी खेली करता आली नाही. स्मिथ फक्त चार धावांवर बाद झाला. स्मिथचा अडथळा बुमराहने दूर केला. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी 192 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 


47 धावांवर 3 विकेट गेल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळेल, असा सर्वांचा अंदाज होता. पण ट्रेविस हेड आणि लाबुशेन यांनी भारताची डोकेदुखी वाढवली. लाबुशेन याने एक बाजू लावून धरली तर दुसऱ्या बाजूला ट्रेविस हेड याने फटकेबाजी केली. हेड याने अवघ्या 95 चेंडूत शतक ठोकले. त्यानंतर त्याने आणखी आक्रमक रुप धारण केले. ट्रेविस हेड याच्या शतकानंतर लाबुशेन यानेही अर्धशतक ठोकले. लाबुशेन आणि ट्रेविस हेड यांची जोडी फोडण्यात भारताच्या भेदक माऱ्यांना यश आले नाही. भारताचे गोलंदाज या जोडीपुढे फिके दिसत होते. हेड आणि लाबुशेन यांनी भारताला सामन्यात कोणताही संधी दिली नाही.  


ट्रेविस हेडचे शतक - 


ट्रेविस हेड यांने झंझावती शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. ट्रेविस हेड याने 120 चेंडूत 137 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 15 चौकार मारले. 


लाबुशेनचे अर्धशतक  -


47 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर लाबुशेन याने संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. लाबुशेन याने 110 चेंडूमध्ये नाबाद 58 धावांची खेळी केली. यामध्ये 4 चौकारांचा समावेश होता. 


भारताची गोलंदाजी - 
ट्रेविस हेड आणि लाबुशेन या जोडीपुढे एकाही भारतीय गोलंदाजाची दाळ शिजली नाही. शामी आणि बुमराह यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी संधी दिलीच नाही. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा ही फिरकी जोडीलाही विकेट घेण्यात यश आले नाही. जाडेजाने 10 षटकात 43 धावा खर्च केल्या. तर कुलदीप यादव याने 10 षटकात 56 धावा दिल्या. या दोघांनाही विकेट घेण्यात अपयश आले. बुमराहने दोन विकेट घेतल्या. तर शामीला एक विकेट मिळाली. सिराजला एक विकेट मिळाली.