World Cup 2023 Final IND vs AUS : रोहित शर्माच्या भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का?... हा प्रश्न विचारण्याचं कारण विश्वचषकाच्या महायुद्धात वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येतायत. त्यामुळं प्रश्न विचारण्यात येतोय की, रोहित शर्माच्या भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनी सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का? 1983, 2011 आणि आता 2023.... रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणारय..


ऑस्ट्रेलियानं आजवरच्या इतिहासात... 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यापैकी 2003 साली पॉण्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा धुव्वा उडवून विश्वचषकाचा मान मिळवला होता. त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या महायुद्धात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा निर्णायक लढाईसाठी पुन्हा आमनेसामने येतायत. वीस वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं चित्र तब्बल 360 अंशांनी बदललंय. भारत ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आर्थिक महासत्ता आधीपासूनच होतीच. पण सध्या भारत ही वन डे क्रिकेटचीही जणू महासत्ता भासतेय...


विश्वचषकाच्या साखळीत भारतानं नऊपैकी नऊ सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला. पण ऑस्ट्रेलियाला नऊपैकी सात सामन्यांमध्येच विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलियाला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांकडून साखळीत हार स्वीकारण्याची वेळ आली. त्यापैकी भारतानं ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 199 धावांत गुंडाळून सहा विकेट्सनी विजयी सलामी दिली. त्यानंतरही भारतीय शिलेदारांनी सातत्यानं कामगिरी बजावून विश्वचषकावर आपल्या निर्विवाद वर्चस्वाचा ठसा उमटवला...


कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलनं विश्वचषकात सातत्यानं धावांचा रतीब घातलाय जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवच्या आक्रमणासमोर दहाही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी सपशेल लोटांगण घातलं. नाही म्हणायला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात  भारताच्या क्षेत्ररक्षणाला गालबोट लागलं, पण भारताच्या सुदैवानं मोहम्मद शमीनं कमालीचं आक्रमण करून किवी फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यामुळंच रोहितसेनेला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारता आली. ऑस्ट्रेलियाच्याही डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या फलंदाजांच्या कामगिरीत कमालीचं सातत्यय. तसंच अॅडम झॅम्पा, जॉश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सनं गोलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावलीय...


दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उपांत्य सामन्यात आपली कामगिरी कमालीची उंचावली. त्यामुळंच कांगारूंना विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट बुक करता आलं. आता फायनलच्या रणांगणात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत.एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षाय. पण विश्वचषकात भारतीय शिलेदारांना गवसलेला सूर पाहता. कमिन्स अँड कंपनीच्या तुलनेत रोहितसेनेचं पारडं जड भासतं...