सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी तामिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला शुक्रवारी टीम इंडियात स्थान देण्यात आलं आहे. त्याआधी शार्दुल ठाकूरला मोहम्मद शमीच्या जागी दुसर्‍या कसोटी सामन्यात संघात स्थान देण्यात आलं होतं.


मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी उमेश यादवच्या स्नायूला ताण आला होता. त्यामुळे त्यांच्या उपचार सुरु आहेत. मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांपूर्वी तो या दुखापतीतून सावरू शकणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टी. नटराजनला उमेश यादवच्या जागी संघात स्थान दिले आहे. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी शार्दुल ठाकूरला मोहम्मद शमीच्या जागी कसोटी संघात स्थान देण्यात आलं होतं.


मोहम्मद शमी आणि उमेश यादव दोघेही बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत राहणार आहेत. 29 वर्षीय नटराजन नेट गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला होता, पण टी -20 आणि एकदिवसीय मालिकेत त्याला संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं करत आपलं संघात स्थान निश्चित केलं. या काळात त्याने चार सामन्यांत आठ बळी (एकदिवसीय सामन्यात दोन आणि टी -20 मध्ये सहा) बळी घेतले.


भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माही दुखापतीतून सावरला असून सिडनीमध्ये 14 दिवसांचा क्वॉरंटाईन काळ संपल्यानंतर तो संघात सामील झाला. कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे.


भारतीय कसोटी संघ


अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, टी. नटराजन.