Ind vs Aus Travis Head Celebration: भारत विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) 184 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 340 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारताला 155 धावाच करता आल्या. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 


ऑस्ट्रेलियाने विजयानंतर जोरदार सेलीब्रेशन केले. दरम्यान सध्या ट्रॅव्हिस हेडने केलेल्या सेलिब्रेशनची सध्या क्रिकेटविश्वात चर्चा आहे. ऋषभ पंतची विकेट घेतल्यानंतर ट्रेव्हिस हेडने विचित्र हातवारे करत सेलिब्रेशन केले. याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू यांनी हेडवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे. 






नवज्योतसिंग सिद्धू काय म्हणाले?


मेलबर्न कसोटीदरम्यान ट्रॅव्हिस हेडचे घृणास्पद वर्तन सज्जनांच्या खेळासाठी चांगले नाही. हे सर्वात वाईट उदाहरण आहे जेव्हा लहान मुले, महिला, तरुण आणि वृद्ध हा खेळ पाहतात. या वर्तनाने एका व्यक्तीचा नव्हे तर सव्वाशे कोटी भारतीयांच्या राष्ट्राचा अपमान केला आहे आणि भावी पिढ्यांना मारक म्हणून कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे काम करा जेणेकरुन इतर कोणी असे करण्यास धजावणार नाही, असं नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले. 


हेडच्या सेलिब्रेशनवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स काय म्हणाला?


पॅट कमिन्स म्हणाला की, त्याने बरेच झेल घेतले. त्यामुळे त्याला असे दाखवायचे असावे की त्याच्या हाताची बोटं आता गरम झाली आहेत. त्यामुळे त्याला बर्फाने भरलेल्या एखाद्या ग्लासमध्ये बोटं घालून ठेवावी लागतील. त्यात वाईट किंवा विचित्र असे काहीच नाही. 


ट्रॅव्हिस हेडच्या सेलिब्रेशनमागचं कारण


ऋषभ पंतला बाद केल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने ज्या पद्धतीने सेलीब्रेशन केले, ते समजणे कठीण होते. मात्र याआधी देखील हेडने या पद्धतीने सेलीब्रेशन केले होते. श्रीलंकेविरुद्ध हेडने गोलंदाजी करतना 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी देखील अशाच पद्धतीने हेडने सेलिब्रेशन केले होते. 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव-


दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.


संबंधित बातमी:


चॅम्पियन्स ट्रॉफीपासून आशिया चषकापर्यंत...; 2025-2027 मधील टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर