मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीला खेळवला जाणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर हा सामना पार पडणार आहे. मात्र या कसोटी सामन्याआधी टीम इंडिया नव्या अडचणीत अडकलेली दिसत आहे. बायो बबल सिक्युरिटी प्रोटोकॉलचे नियम मोडल्यामुळे भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह एकूण पाच खेळाडू संघातून अलग करण्यात आलं आहे.
रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बायो बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यानंतर या खेळाडूंना दोन्ही संघांच्या खेळाडूंपासून वेगळं करुन आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना दोन्ही संघातील उर्वरित खेळाडूंना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र ते सराव करु शकणार आहेत.
खेळाडूंना बायो-बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका बायो-बबलमध्ये खेळली जात आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघातील खेळाडूंना बायो-बबलमधून बाहेर जाऊ दिले जाणार नाही. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कारवाईपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ऋषभ पंतकडून बायो बबल नियमांचं उल्लंघन, टीम इंडियाच्या अडचणी वाढणार?
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये ते एका हॉटेलमध्ये जेवताना दिसत आहेत. वास्तविक, हे पाच जण मेलबर्नमधील बीबीक्यू रेस्टॉरंटच्या सिक्रेट किचनमध्ये दिसत आहेत. तर बायो बबल नियमानुसार परवानगी केवळ बाहेर बसून खाण्याची आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एज रेस्टॉरंटच्या कर्मचार्यांनी पुष्टी केली की खेळाडूंनी रेस्टॉरंटला भेट दिली आणि आत बसले. नवलदीप सिंग नावाच्या एका भारतीय चाहत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने भारतीय खेळाडूंचं 118.69 डॉलर्सचे बिल दिलं असल्याचं सांगितलं.
ऋषभ पंतने आपल्याला मिठी मारल्याचं नवलदीपने आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. नवलदीपने उत्साहाच्या भरात भारतीय खेळाडूंसोबत आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, मात्र त्यामुळे भारतीय संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे. टीम इंडिया सध्या बायो बबल झोनमध्ये असून अशा परिस्थितीत पाचही खेळाडू बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. इतकच नव्हे तर पंतने बायो बबलमध्ये नसलेल्या एका व्यक्तीला मिठी मारली. त्यामुळे या प्रकरणी टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.