मेलबर्न : ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेली टीम इंडिया नव्या अडचणीत सापडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियामध्ये कोविड 19 च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यातच टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी बायो बबलचे नियम मोडले आहेत. या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.


टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. मेलबर्नमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. या हॉटेलमध्ये एका चाहत्याने या खेळाडूंचे बिल भरले. यावेळी फॅनचे औदार्य पाहून ऋषभ पंतने त्याला मिठी मारली.


मात्र ऋषभ पंतने केलेले हे कृत्य क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेल्या बायो बबलच्या नियमांच्या विरोधात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया याक्षणी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेली नाही, परंतु या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे.
ऋषभ पंत आणि बाकीच्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपासणीचा काय परिणाम होईल, यावर काही सांगता येणार नाही. परंतु खेळाडूंना कोविड टेस्टमधून जावे लागू शकते.





टीम इंडियाचा पुढील सामना सिडनीत


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेचा तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे. सिडनीमध्ये कोविड 19 च्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सध्या खेळाडूंना मेलबर्नमध्ये ठेवण्यात आले आहे. 4 जानेवारी रोजी दोन्ही संघांचे खेळाडू सिडनीला रवाना होऊ शकतात.