Australia vs India 5th Test : सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला नाही. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजीला सुरुवात केली. टीम इंडियाने कांगारू संघाला सिडनी कसोटी जिंकण्यासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने लंच ब्रेकपर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात 71 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजून 91 धावांची गरज आहे. तर सिडनी कसोटी जिंकण्यासाठी भारताला अजूनही 7 विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. या मैदानावर टीम इंडियाचा शेवटचा विजय जानेवारी 1978 मध्ये झाला होता, जेव्हा भारताचे नेतृत्व बिशन सिंग बेदी करत होते. आता भारतीय संघाला 47 वर्षांनंतर सिडनी क्रिकेट मैदानावर झेंडा फडकवण्याची संधी आहे.
भारताचा आज दुसरा डाव 157 धावांवर आटोपला आणि पहिल्या डावातील चार धावांच्या आघाडीसह एकूण 161 धावांची आघाडी घेतली. आज भारताने 16 धावा करून उर्वरित चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात केली. बुमराहच्या अनुपस्थितीत उस्मान ख्वाजा आणि सॅम कॉन्स्टास यांनी 23 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने सॅम कॉन्स्टासला बाद करून ही भागीदारी तोडली. 17 चेंडूत 22 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर प्रसिद्धने लॅबुशेन (6) आणि स्टीव्ह स्मिथ (4) यांनाही बाद केले. सध्या ख्वाजा 19 धावा करून क्रीजवर असून ट्रॅव्हिस हेडने पाच धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 20.5 षटके खेळली गेली आणि 87 धावा झाल्या आणि सात विकेट पडल्या. यामध्ये भारताच्या चार तर ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स पडल्या.
बुमराह मैदानातून गायब
सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहला स्कॅनसाठी रुग्णालयात गेला होता. सध्या जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारतीय संघाची कमान सांभाळत आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अद्याप बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहने आतापर्यंत सर्वाधिक 32 बळी घेतले आहेत.
हे ही वाचा -