(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, India Wins Gabba Test | ब्रिस्बेन कसोटी भारताने जिंकली, बॉर्डर-गावस्कर मालिकाही खिशात
IND vs AUS, India Wins Gabba Test : ब्रिस्बेन कसोटीत भारताचा विजय झाला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली
ब्रिस्बेन : क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळालं. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.
हा कसोटी सामना असला तरी भारतीय संघ दुसऱ्या डावात वन डे सामन्याप्रमाणेच फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. परंतु युवा फलंदाज शुभमन गिलने 91 धावांची खेळी केली. त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताचा डाव सांभाळला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही 24 धावा करुन माघारी परतला. मग चेतेश्वर पुजाराने रिषभ पंतला हाताशी घेत संयमी फलंदाजी केली. 56 धावा करुन तोही माघारी परतला. यानंतर रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. जिंकण्यासाठी दहा धावांची गरज असताना सुंदर 22 धावा करुन बाद झाला. यानंतर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना शार्दुल ठाकूर (2 धावा) माघारी परतला. मग रिषभ पंतने (89 धावा) ने विजयी चौकार लगावला आणि सामन्यासह मालिका खिशात घातली.
अॅडलेड कसोटीमधील लाजिरवाणा पराभव ते मालिका विजय, भारताचा हा विजय निश्चितच थक्क करणारा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत भारताचा संपूर्ण संघ 36 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला आणि संघाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. मेलबर्न कसोटीत भारताने दमदार कमबॅक केलं. त्यानंतरची सिडनी कसोटी भारताने ड्रॉ केली. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारतासाठी विजयापेक्षा कमी नव्हता. मग अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकत होता. 328 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने सुरुवातीला बचावात्मक खेळ केला. त्यामुळे भारता हा कसोटी सामना ड्रॉ करण्याच्या प्रयत्नात असल्याचंच चित्र होतं. परंतु शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे सामन्याचं चित्र पालटलं आणि हा सामना तीन विकेट्सनी जिंकला.