Australia vs India 4th Test Day-3 : मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषत: नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा दिवस गाजवला. तिसऱ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी अक्षरशः रडवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 358/9 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून नाबाद परतला आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज क्रीझवर आहे. टीम इंडिया आता कांगारूंपेक्षा 116 धावांनी मागे आहे.






नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी


ऋषभ पंत 28 धावा करून बाद झाला आणि रवींद्र जडेजा 17 धावा करून बाद झाला, तेव्हा भारताला फॉलोऑनचा धोका होता. भारताने 221 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर सामना भारताच्या हातातून पूर्णपणे निसटल्यासारखे वाटले, पण नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हार मानली नाही. या दोघांनीही आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.






नितीश आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. सुंदरने 162 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. तर नितीशने जबरदस्त शतक झळकावले. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 चौकार आणि 1 षटकार आला. रेड्डीने 171 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. नितीश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. 


दुसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघाने केवळ 164 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. इथून भारतीय संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या गाठू शकणार नाही असे वाटत होते. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 191 धावांच्या स्कोअरवर सहावी तर 221 रन्सच्या स्कोअरवर सातवी विकेट गमावली. यानंतर जवळपास सर्वच आशा मावळल्या. येथून नितीश रेड्डी आणि सुंदर यांनी जबाबदारी स्वीकारली आणि आठवी विकेट पडेपर्यंत संघाला 348 धावांपर्यंत नेले. तिसरा दिवस टीम इंडियाच्या नावावर होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.


हे ही वाचा -


Nitish Kumar Reddy First Century : लढला, भिडला, झुकेगा नहीं साला! चौकार मारत नितीश कुमार रेड्डीने ठोकले कारकिर्दीतील पहिले शतक, वडिलांच्या डोळ्यात पाणी