IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvs AUS) यांच्यात आता कसोटी मालिका सुरु असून पहिल्या सामन्यात भारताने अप्रतिम असा एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय संघासाठी (Team india) आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीतून सावरला असून तो दिल्ली येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी संघासोबत जोडला जाणार आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्वीट करत ही माहिती दिली आहे.  श्रेयसला बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात म्हणजेच नागपूर कसोटीत दुखापतीमुळे खेळता आले नाही, पण आता श्रेयस अय्यर दिल्लीत 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अंतिम 11 मध्ये असण्याची दाट शक्यता आहे. 


बीसीसीआयनं एक निवेदन जारी केलं असून त्यात लिहिलं आहे की, 'भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने पाठीच्या दुखापतीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याची रिकव्हरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्याला बीसीसीआय वैद्यकीय पथकाने देखील मंजुरी दिली आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारताच्या मास्टरकार्ड ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी श्रेयस नवी दिल्लीत संघासोबत सामील होईल.


दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव






पाचव्या क्रमांकासाठीच्या शर्यतीत श्रेयस


श्रेयस दुखापत होण्यापूर्वी संघात एक प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याने 2022 मध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा केल्या, परंतु त्याची दुखापत आणि ऋषभ पंतच्या अपघातामुळे संघ व्यवस्थापनाला नवीन रणनीती आखण्यास भाग पाडलं. श्रेयस पाचव्या नंबरसाठी शर्यतीत आहे. दरम्यान श्रेयस फिट झाल्यास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. श्रेयस अय्यर अधिकतर कसोटी फॉर्मेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाने नागपूर कसोटीत पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला खेळण्याची संधी दिली आहे. आता दुसऱ्या कसोटीत कोणाला विश्रांती मिळेल आणि कोण संघात हे पाहावे लागेल.


हे देखील वाचा-