IND vs AUS 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात भारतानं सहा विकेट्सनं विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्यांची टी-20 मालिकेत 2-1 अशी जिंकली. भारताच्या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) महत्वाची भूमिका बजवली. या सामन्यात विराट कोहलीनं 63 धावांचं योगदान दिलं. या कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीच्या नावावर खास विक्रमाची नोंद झालीय. विराट कोहली आता सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय. तसेच याबाबतीत त्यानं भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडलाही (Rahul Dravid) मागं टाकलंय. 


भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिननं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 34 हजार 357 धावा केल्या. यानंतर विराट कोहली 24 हजार 078 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत राहुल द्रविड 24 हजार 64 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीनं 2008 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीस विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. मात्र, आता जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची गणना केली जाते. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कामगिरी
विराट कोहलीनं 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. विराटला त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या 20 सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. मात्र, संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर येताच त्याच्या खेळीत पूर्णपणे बदल पाहायला मिळाला. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 8 हजार 74 धावांची नोंद आहे. विराटनं टी-20 क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून धमाकेदार कामगिरी केली. विराट कोहली अशा काही फलंदाजांपैकी एक आहे, ज्यांची या फॉरमॅटमध्ये फलंदाजीची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. विराट कोहलीनं 107 टी-20 सामन्यात 3 हजार 660 धावा केल्या आहेत.


आशिया चषकात दमदार कामगिरी
जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या विराट कोहलीनं आशिया चषक 2022 स्पर्धेत आपला फॉर्म गवसला. दरम्यान, आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मोहम्मद रिझवाननंतर तो दुसऱ्या क्रमांकावर होता. या स्पर्धेत विराटच्या बॅटीतून त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिलं शतकंही झळकलं. आफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं 53 चेंडूत शतक ठोकलं. हे त्याच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील 71 वं शतक होतं. 


हे देखील वाचा-