KL rahul Wicket Controversy IND vs AUS 1st Perth Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकूनही भारतीय संघ संघर्ष करताना दिसत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाचे पहिले दोन फलंदाज खाते न उघडता बाद झाले तर तिसरा फलंदाज 5 धावा करत गारद झाला. सलामीच्या भूमिकेत आलेल्या केएल राहुलने निश्चितच चांगली फलंदाजी केली, पण वादग्रस्त निर्णयामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. लंच ब्रेकपर्यंत भारताची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा होती.
KL राहुल नक्की OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ!
पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाला चौथा धक्का सलामीवीर केएल राहुलच्या रूपाने बसला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला लागला की पॅडला यावरून मोठा गदारोळ झाला. एवढेच नाही तर अंपायरने आऊट दिल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतताना केएल राहुल नाराज दिसला.
भारतीय संघाच्या डावातील 23व्या षटकातील दुसरा चेंडू मिचेल स्टार्कने केएल राहुलला टाकला. या चेंडूवर ऑस्ट्रेलियन संघाने कॅच आऊटचे अपील केले आणि मैदानावरील पंचांनी राहुलला नॉट-आऊट दिले. यानंतर पॅट कमिन्सने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले की जेव्हा चेंडू बॅटजवळून जात होता तेव्हा आवाज ऐकू आला. पण तो आवाज बॅटचा होता की पॅडचा हे स्पष्ट झाले नाही.
केएल राहुलची विकेट वादग्रस्त ठरली असून यावरून सोशल मीडियावर राडा सुरू झाला आहे. समालोचन करताना माजी पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रम म्हणाला की राहुलच्या विकेटवर शंका घेतली. संजय मांजरेकर म्हणाले, 'केएल राहुलसोबत अन्याय झाला. तो चांगला खेळत होता. चांगला सेट दिसत होता. त्याची बॅट पॅडला लागल्यावर चेंडू बॅटजवळून गेला. या निर्णयावर मी नाराज आहे. अंपायरने सहज निर्णय दिला. थोडा विचार करायला पाहिजे होता. मलाही आश्चर्य वाटते'.