Rohit Sharma, Virat Kohali, Team India Squad for Afghanistan Series: टीम इंडियाचा (Team India) कणा असलेले दोन स्टार्स म्हणजे, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli). गेल्या अनेक दिवसांपासून रोहित आणि विराट टी20 (T20 Series) मधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. या चर्चांनंतर अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण, जेव्हा अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हा कुठे चाहत्यांच्या जीवात जीव आला. अफगाणिस्तानविरोधात टीम इंडियाचे दोन्ही धुरंधर मैदानात खेळताना दिसणार आहेत. 


रोहित शर्माचं कर्णधार म्हणून टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन झालं आहे. तसेच, विराट कोहलीही पुन्हा एकदा टीम इंडियाकडून टी-20 फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत स्थान देण्यात आलं आहे. मात्र हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. तसेच, ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड देखील या मालिकेत दिसणार नाहीत. तर संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना विकेटकिपर म्हणून संधी मिळाली आहे. 


रोहित-विराटचं पुनरागमन 


भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली अखेर T20 फॉरमॅटमध्ये परतले आहेत. दोघांचंही पुनरागमन तब्बल 14 महिन्यांनंतर झालं आहे. रोहित आणि विराटला अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या होम टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे. 


रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर, दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे मालिकेतून बाहेर आहेत. तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाला या वर्षी जूनमध्ये होणारा टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे. या मोठ्या ICC टूर्नामेंटपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची T20 आंतरराष्ट्रीय मालिका आहे. 


रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी20 वर्ल्डकपच्या रणांगणात 


अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाला मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) खेळवली जाईल आणि मग त्यानंतर विश्वचषक खेळवला जाईल. अशा परिस्थितीत टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्धच्या या सीरिजद्वारे विश्वचषकाचं रणशिंग फुंकेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


रोहित आणि कोहलीच्या पुनरागमनामुळे त्यांचंही विश्वचषकात स्थान निश्चित असल्याचं दिसून येत आहे. रोहितच्या नेतृत्वाखालीच टीम इंडिया विश्वचषकात प्रवेश करू शकते. याशिवाय या मालिकेतील आणि आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच इतर खेळाडूंचे स्थान निश्चित केलं जाऊ शकतं.