IND vs AFG 3rd T20I: चिन्नास्वामीवर झालेल्या ऐतिहासिक डबल सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियानं थरारक विजय मिळवला. हा सामना कोट्यवधी चाहत्यांच्या कायमच लक्षात राहणार आहे. कारण, या सामन्यात एक नाही तर दोन सुपरओव्हर झाल्या. दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने 11 धावा करत अफगाणिस्तान संघाला 12 धावांचे आव्हान दिले होते. रवि बिश्नोईच्या जाळ्यात अफगाणिस्तानचे फलंदाज अडकले अन् तीन चेंडूमध्येच भारताने सामना जिंकला. रवि बिश्नोई याने तीन चेंडूमध्ये दोन विकेट घेत भारताला थरारक विजय मिळवून दिला.  भारतानं अफगाणिस्तानचा धावांनी पराभव करून, तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलं. कर्णधार रोहित शर्मानं ट्वेन्टी ट्वेन्टीत झळकावलेलं आजवरचं पाचवं शतक आणि त्यानं रिंकू सिंगच्या साथीनं रचलेली 190 धावांची अभेद्य भागीदारी भारताच्या सलग तिसऱ्या विजयात निर्णायक ठरली.


भारताने प्रथम फलंदाजी करताना 212 धावांचा डोंगर उभारला. भारताच्या या विराट आव्हानाला अफगाणिस्तानकडून जशास तसं उत्तर देण्यात आले. अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 212 धावांपर्यंत मजल मारत सामना बरोबरीत सोडला. त्यामुळे सुपरओव्हर घेण्यात आली. अफगाणिस्तान संघाने पहिल्या सुपरओव्हरमध्ये 16 धावा कुटल्या. प्रत्युत्तरदाखल भारतालाही 16 धावाच काढता आल्या. त्यामुळे सामन्यानंतर सुपरओव्हरही टाय झाली. त्यामुळे दुसरी सुपरओव्हर घ्यावी लागली. दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने बाजी मारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 11 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघाला फक्त एक धाव काढता आली. रवि बिश्नोई याने फक्त तीन चेंडूमध्ये अफगाणिस्तानच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना अतिशय रोमांचक झाला. सामना आधी टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली. भारत अफगाणिस्तान मॅच सस्पेन्स, थ्रिल, पैसा वसूल करणारी ठरली. हजारो चाहत्यांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहणारा सामना झाला. 


सामना बरोबरीत - 


भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने अवघ्या 69 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 121 धावांची खेळी केली. त्याला रिंकू सिंह याने नाबाद 69 धावा करत चांगली साथ दिली. रिंकू सिंह याने 39 चेंडूमध्ये सहा षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. भारताने एकवेळ 22 धावांवर चार फलंदाज गमावले होते, त्यानंतर रोहित आणि रिंकू यांनी 190 धावांची अभेद्य भागिदारी रचत 212 धावांचा डोंगर उभारला.  प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानकडून गुरबाज, जादरन, गुलबादिन नैब आणि मोहम्मद नबी यांनी झंझावती खेळी केली. भारताकडून फक्त वॉशिंगटन सुंदर याला प्रभावी मारा करता आला, त्याने तीन विकेट घेतल्या. गुरबाज आणि जादरान यांनी 11 षटकात 93 धावांची सलामी दिली. दोघांनीही अर्धशतके ठोकली. गुरबाद याने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. यामध्ये चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. तर जादरान याने एक षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. दुलबादीन नैब याने अवघ्या 23 चेंडूत 55 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. मोहम्मद नबी यानेही 16 चेंडूत 34 धावांचं योगदान दिले. यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. 


पहिल्या सुपरओव्हरमध्ये काय झालं?  


अफगानिस्तानकडून गुरबाज आणि नायब गुलबदीन सलामीला आले होते. भारताकडून मुकेश कुमार यानं षटक टाकलं. अफगाणिस्तान संघाने सुपरओव्हरमध्ये एक विकेटच्या मोबदल्यात 16 धावा काढल्या. 


01 - मुकेश कुमारच्या चेंडूवर गुलबदीन याने लाँग ऑनला फटका मारला. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात गुलबदीन बाद झाला. विराट कोहलीच्या अचूक थ्रोमुळे पहिल्याच चेंडूवर गुलबदीन याने विकेट फेकली. 


0.2- मोहम्मद नबी याने मुकेश कुमारच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. 


0.3 - गुरबाज याने मुकेश कुमारचा चेंडूवर चौकार लगावला. 


0.4. गुरबाज याने मुकेश कुमारच्या चेंडूवर एक धाव घेतली. 


0.5 - मोहम्मद नबी याने मुकेश कुमारचा चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवत सहा धावा वसूल केल्या. 


0.6. मुकेश कुमार याने नबीला अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. संजू सॅमसन याने टाकलेला थ्रो मुकेश कुमार याला अडवता आला नाही. नबी आणि गुरबाज यांनी तीन धावा काढल्या. अफागणिस्तान संघाने बायच्या रुपात तीन धावा काढल्या. 


भारताला विजयासाठी अफगाणिस्तानकडून 17 धावांचे आव्हान मिळाले. भारताकडून यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा सलामीला आले होते. तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्लाह उमरजई याने गोलंदाजी केली. 


0.1 - अजमतुल्लाह उमरजई याने रोहित शर्माला चेंडू फेकला. या चेंडूवर रोहित शर्मा याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण फसला तरी रोहित आणि यशस्वी जायस्वाल यांनी एक चोरटी धाव घेतली. 


0.2 - अजमतुल्लाह उमरजई याने अतिशय चुताराईने गोलंदाजी केली. दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल याला फक्त एक धाव घेता आली. 


0.3 - रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर शानदार षटकार मारला. भारताची धावसंख्या 3 चेंडू 8 धावा.... भारताला विजयासाठी 3 चेंडूत 9 धावांची गरज


0.4 - रोहित शर्माने चौथ्या चेंडूवरही ऑफसाईडला कव्हरवरुन जबरदस्त षटकार मारला. भारताने चार चेंडूत 14 धावा केल्या. भारताला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज 


0.5 - अजमतुल्लाह उमरजई याच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने एक धाव काढली. आता भारताला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची गरज (रोहित शर्मा रिटायरहर्ट होऊन तंबूत परतला)


0.6 - अखेरच्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल याला एक धाव काढता आली. सुपर ओव्हरही टाय झाली.


दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये काय झालं?


सुपरओव्हरही टाय झाल्यामुळे आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारताकडून रोहित शर्मा आणि रिंकू सिंह मैदानात उतरले होते. तर अफगाणिस्तानकडून फरीद अहमद याने गोलंदाजाची जबाबदारी घेतली होती. 


0.1 - रोहित शर्माने फरीद अहमद याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. 


0.2 - रोहित शर्माने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत इरादे स्पष्ट केले. 


0.3. - रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताने तीन चेंडूमध्ये 11 धावा वसूल केल्या. 


0.4 - मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू सिंह झेलबाद झाला. भारताला 11 धावांवर पहिला धक्का बसला. 


0.5 - संजू सॅमसन याला मोठा फटका मारता आला नाही, विकेटकिपरकडे चेंडू गेल्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा धावबाद झाला.  त्यामुळे अफगाणिस्तान संघाला विजयासाठी 12 धावांचे आव्हान मिळाले. 


दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 12 धावांचे आव्हान दिले. भारताकडून रवि बिश्नोई याने गोलंदाजी केली. तर अफगाणिस्तानकडून गुरबाज आणि मोहम्मद नबी फलंदाजीसाठी उतरले. 


0.1 - रवि बिश्नोईच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नबी याने मोठा फटका माऱण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू रिंकू सिंह याच्या हातात विसावला. अफगाणिस्तानला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. अफगाणिस्तानला विजयासाठी 5 चेंडूत 12 धावांची गरज.. फलंदाजीसाठी जनत मैदानावर आला. 


0.2- रवि बिश्नोईच्या दुसऱ्या चेंडूवर जनत याने एक धाव घेतली.  अफगाणिस्तानला विजयासाठी 4 चेंडूत 11 धावांची गरज 


03. - गुरबाज याला बाद करत रवि बिश्नोईने भारताला विजय मिळवून दिला.