IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात चौथा टी20 सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्या मैदानावर (Rajkot Cricicket Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारत आजचा सामना जिंकून बरोबरी करण्याचा प्रयत्न करणार असून दक्षिण आफ्रिका विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे.
सामना पार पडणाऱ्या सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन मैदानाची खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण याठिकाणी फलंदाजांना अधिक फायदा होत असल्याचं याआधीच्या सामन्यांमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे आज देखील नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची शक्यता आहे. दोन्ही संघासाठी सामना महत्त्वाचा असल्याने एक चुरशीचा खेळ आज पाहायला मिळू शकतो.
कशी आहे मैदानाची स्थिती?
राजकोटच्या सौराष्ट्र स्टेडियममधअये आज सामना होणार असून या ठिकाणी आधी रणजी सामन्यांमध्ये फलंदाजांनी तुफान खेळी केल्याचं पाहायला मिळालं आहे. भारताच्या रवींद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांनी रणजी सामन्यांमध्ये याठिकाणी त्रिशतक झळकावलं आहे. यातून या सामन्याची खेळपट्टी फलंदाजासाठी अधिक चांगली असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आजही एक मोठी धावसंख्या उभी राहण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी 10 सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सात सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, फक्त दोनच सामने गमावले आहेत. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. आता देखील मालिकेतील दोन सामने आफ्रिकेने जिंकत 2-1 ने वर्चस्व घेतलं आहे.