नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाची 'द वॉल' अशी ओळख असणारे राहुल द्रविड आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. न्यूझीलँड दौऱ्यापासून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीला नकार दिला असता टीम इंडियाच्या 'फॅब-5' मधील एक माजी खेळाडूला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली असती. बीसीसीआयने आपला प्लान-बी तयार ठेवला होता. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविड यांनी नकार दिला असता तर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असती. बीसीसीआयने याबाबत लक्ष्मण यांच्यासोबत चर्चाही केली होती. मात्र, काही मुद्यांवर बीसीसीआय आणि लक्ष्मण यांच्यात सहमती झाली नव्हती. मात्र, तरीदेखील बीसीसीआयने द्रविड यांनी नकार दिला असता तर प्लान-बी तयार ठेवला होता. 


'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. लक्ष्मण हे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बोर्डाच्या बॅकअप प्लानमध्ये होते. राहुल द्रविड यांनी नकार दिला असता तर लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी दिली असती. 


राहुल द्रविड हे सुरुवातीला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास फारसे उत्सुक नव्हते अशी चर्चा होती. मात्र, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या अनेक चर्चानंतर राहुल द्रविड यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला. 


लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी


माजी कर्णधार राहुल द्रविडला (Rahul Dravid) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक केल्यानंतर बीसीसीआयनं (BCCI) आणखी एका माजी खेळाडूला नवी जबाबदारी दिली आहे. राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षकाचं पद सांभाळल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमधील अध्यक्षपद रिकामं झालं होतं. या जागेवर आता माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही. एस लक्ष्मणची (vvs laxman) निवड करण्यात आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एएनआयसोबत बोलताना गांगुलीनं लक्ष्मण एनसीएचं अध्यक्षपद सांभाळणार असल्याचं सांगितलं. भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर लक्ष्मण एनसीएची सुत्रे सांभाळण्याची शक्यता आहे.  लक्ष्मण भारत अ, अंडर-19 आणि एनसीएची जबाबदारी स्विकारण्याची शक्यता आहे. तर न्यूझीलंड दौऱ्यापासून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्विकारणार आहे.