India vs Australia World Cup 2023 Final: लहरा दो, लहरा दो... सरकशी का परचम लहरा दो... संपूर्ण जगासह देशाचं लक्ष आज फक्त फक्त गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमकडे (Narendra Modi Stadium) लागलं आहे. गुजरातमधील स्टेडियमध्ये आज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडिया (Team India) तिसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याच्या तयारीत आहे. 2003 च्या वर्डकपमध्ये कांगारूंकडून झालेल्या पराभवाचा बदला टीम इंडियानं घ्यावा, अशी प्रत्येक देशवासीयाची इच्छा आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रोहित शर्मानं विजयाचा झेंडा फडकवावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. वर्डकप 2023 (ICC World Cup 2023) स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच टीम इंडियाचा फॉर्म आणि खेळाडूंचा जोश पाहता भारतीय क्रिकेट संघ रविवारी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार आणि विश्वचषक उंचावणार असल्याचं बोललं जात आहे.


विश्वचषकाच्या महायुद्धातल्या निर्णायक लढाईसाठी अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालं आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमधल्या सलामीच्या लढाईनं विश्वचषकाच्या मोहिमेला पाच ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममधून सुरुवात झाली होती. आणि आता विश्वचषक मोहिमेच्या सांगतेला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा अहमदाबादच्या रणांगणात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारतानं आजवर 1983 आणि 2011 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. तसेच ऑस्ट्रेलियानं 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली विश्वचषकाचा मान मिळवला आहे.


योगायोगाची बाब म्हणजे, विश्वचषकाच्या महायुद्धात यंदा तब्बल वीस वर्षांनी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघांत पुन्हा निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर वीस वर्षांनी दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यामुळं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा रोहित शर्माचा भारतीय संघ वचपा काढणार का, याकडे भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.


टीम इंडिया दहा वर्षांचा दुष्काळ संपवणार, ICC ट्रॉफी उंचावणार 


2023 च्या वर्ल्डकपची फायनल सुरू होण्यापूर्वी अवघे काहीच कास शिल्लक राहिले आहेत.  शनिवारी दोन्ही संघांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रॅक्टिस केली. यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पत्रकार परिषदही घेतली. यादरम्यान रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स या दोघांनीही फायनलच्या तयारीबद्दल बेधडक आणि स्पष्ट उत्तरं दिली. टीम इंडियानं 2013 पासून ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. टीम इंडियानं शेवटच्या वेळी 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. तेव्हापासून, भारतीय क्रिकेट संघानं अनेक एकदिवसीय विश्वचषक, T20 विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु विजेतेपद मिळवता आलेलं नाही. मात्र, आता रविवारी दहा वर्षांचा दुष्काळ नक्कीच संपेल आणि टीम इंडिया आपली आयसीसी ट्रॉफी नक्कीच उंचावेल, असा विश्वास प्रत्येक भारतीयाला आहे.  


2003 मध्ये टीम इंडियाचा झालेला पराभव 


गेल्या वेळी 360 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय क्रिकेट संघ 39.2 षटकांत 234 धावांवरच गारद झालेला. वीरेंद्र सेहवागनं सर्वाधिक 82 धावांची खेळी खेळली. सचिन तेंडुलकर (4), कर्णधार गांगुली (24), मोहम्मद कैफ (0), राहुल द्रविड (47), युवराज सिंह (24) आणि दिनेश मोंगिया (12) यांना काही विशेष खेळी करता आलेली नव्हती. 2003 मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली 'दादागिरी' चालली खरी. पण आता 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचे संपूर्ण संघ खूप बदलले आहेत. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ कांगारूंच्या तुलनेत खूपच मजबूत दिसत आहे. यावेळी विश्वचषकात नव्या टीम इंडियाची 'दादागिरी' पाहायला मिळत आहे. यामुळेच भारतीय क्रिकेट संघानं या मोसमात एकही सामना गमावलेला नाही.


वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियानं एकही सामना गमावला नाही 


भारतीय क्रिकेट संघानं आतापर्यंतचे सर्व 10 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 10 पैकी 8 सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघानं पहिला उपांत्य सामना खेळला, ज्यामध्ये त्यांनी शेवटच्या उपविजेत्या न्यूझीलंडचा 70 धावांच्या फरकानं पराभव केला. तर दुसऱ्या सेमीफायनल्समध्ये कांगारू संघानं चोकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला.


आता ऑस्ट्रेलियन संघ आठव्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. आतापर्यंत त्यानं 7 पैकी सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. 1975 मध्ये वेस्ट इंडीज आणि 1996 मध्ये श्रीलंकेकडून दोनदा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर ऑस्ट्रेलियानं 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी 1999 ते 2007 या काळात सलग तीन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. 


ऑस्ट्रेलियानं 7 वेळा फायनल खेळली, 5 वेळा जिंकली 


1975 मध्ये पराभूत, Vs वेस्ट इंडीज, लॉर्ड्स 
1987 मध्ये जिंकले, Vs इंग्लंड, ईडन गार्डन्स 
1996 मध्ये पराभूत, Vs श्रीलंका, लाहोर
1999 मध्ये जिंकले, Vs पाकिस्तान, लॉर्ड्स 
2003 मध्ये जिंकले, Vs टीम इंडिया, जोहानिसबर्ग 
2007 मध्ये जिंकले, Vs श्रीलंका, ब्रिजटाउन 
2015 मध्ये जिंकले, Vs न्यूजीलंड, मेलबर्न 


टीम इंडियानं तीन वेळा फायनल खेळली, 2 वेळा जिंकली 


1983 मध्ये जिंकले, Vs वेस्टइंडीज, लॉर्ड्स 
2003 मध्ये पराभूत, Vs ऑस्ट्रेलिया, जोहानिसबर्ग 
2011 मध्ये जिंकले, Vs श्रीलंका, वानखेडे (मुंबई)