ICC World Cup 2023 : अफगाणिस्तान संघाने सलग चौथ्या विजयाची नोंद करत विश्वचषकात खळबळ माजवली आहे. अफगाणिस्तान संघाने आठ गुणासह सेमीफायनलकडे पावले टाकली आहत. अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाचे समान गुण आहेत, पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा रनरेट अफगाणिस्तानपेक्षा चांगलाय. त्यामुळे ते आघाडीच्या चार संघामध्ये आहे.  


अफगाणिस्तान संघाने विश्वचषकात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 2003 मध्ये केनियाने सर्वांनाच चकीत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. तसाच करिष्मा अफगाणिस्तानचा संघ करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. अफगाणिस्तान संघाने चार विजयासह सेमीफायनलच्या दिशेने पावले उचलली आहेत.  


सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तान कसा पोहचणार ?


भन्नाट फॉर्मात असलेल्या अफगाणिस्तानला उर्वरीत दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघासोबत त्यांना सामने खेळायचे आहे. या दोन्ही संघाचा पराभव केल्यास अफगाणिस्तानला सेमीफायनलचे तिकिट मिळू शकते. अफगाणिस्तान संघाची सेमफायनलमध्ये जाण्याची शक्यता 52टक्के इतकी आहे. इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या विश्वचषक विजेत्या संघाचा पराभव करत अफगाणिस्तानने उलटफेर केलाय. आता पुन्हा एकदा उलटफेर करण्यात अफगाणिस्तान सज्ज आहे. अफगाणिस्तानच्या पुढील दोन सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया अथवा दक्षिण आफ्रिका यापैकी एका संघाचा पराभव केला तरी त्यांना सेमीफायनलचे तिकिट मिळू शकते, पण इतर संघाच्या जय-परायजयावर अवलंबून रहावे लागेल. जर अफगाणिस्तान दोन्ही सामन्यात पराभूत झाला, तर सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता नाही. 


त्याशिवाय अफगाणिस्तानला आज होणाऱ्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होत असलेला सामना नॉकआऊटसारखा सामना असेल. हा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यासाठी जितका महत्वाचा आहे, तितकचा अफगाणिस्तानसाठी महत्वाचा आहे. कारण, या सामन्याच्या निकालावर अफगाणिस्तान संघाचा सेमीफायनलची वाट ठरणार आहे. 


अफगाणिस्तानकडून नेदरलँड्सचा धुव्वा


अफगाणिस्ताननं नेदरलँड्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत चौथा विजय साजरा केला. अफगाणिस्तानचा हा सात सामन्यांमधला चौथा विजय ठरला. अफगाणिस्ताननं इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांना हरवून विश्वचषकात आधीच खळबळ निर्माण केली आहे. लखनौमधल्या सामन्यात नेदरलँड्सला हरवून, अफगाणिस्ताननं विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. या सामन्यात अफगाणिस्तानच्या आक्रमणासमोर नेदरलँड्सच्या फलंदाजांनी १७९ धावांत लोटांगण घातलं. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीनं तीन आणि नूर अहमदनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर अफगाणिस्ताननं १११ चेंडू आणि सात विकेट्स राखून विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. अफगाणिस्ताकडून रहमत शाहनं ५२, हशमत आफ्रिदीनं नाबाद ५६ आणि आझमतुल्ला ओमरझाईनं नाबाद ३१ धावांची खेळी उभारली.