ICC Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022च्या सराव सामन्यात भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला 2 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताची फलंदाज हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) शतक ठोकलं. तर, सलामीवीर यस्तिका भाटियानंही अर्धशतकीय कामगिरी केलीय. त्यानंतर गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) ताकद दाखवली. या सामन्यात तिनं दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. 


नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं 50 षटकांत 9 गडी गमावून 244 धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर स्मृती मांधना केवळ 12 धावाच करू शकली. दुखापतीमुळं तिला मैदानाबाहेर जावं लागलं. यानंतर दीप्ती शर्मा अवघ्या 5 धावा करून माघारी परतली. कर्णधार मिताली राज शून्यावर बाद झाली. त्याचवेळी यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषही 11 धावांचे योगदान देऊ शकली आणि स्नेह राणानं 14 धावांवर असताना आपली विकेट्स गमावली. दरम्यान, हरमनप्रीत सिंहनं 114 चेंडूत 103 धावा केल्या. ज्यात 9 चौकारांचा समावेश होता. तर, भारताची सलामीवीर यस्तिकानं 78 चेंडूत 58 धावा केल्या. ज्यात 4 चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. 
 
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची चांगली खेळी
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाला 50 षटकांत 7 विकेट्स गमावून 242 धावाच करता आल्या. संघासाठी कर्णधार सुने लुसनं चांगली खेळी केली. तिनं 101 चेंडूत 94 धावा केल्या. तर सलामीवीर लॉरा वोलवॉर्टनं 75 धावांची चांगली खेळी केली. ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. 


राजेश्वरी गायकवाडची दमदार गोलंदाजी
भारताची गोलंदाज राजेश्वरी दमदार कामगिरी करून दाखवली. तिनं 10 षटकात 44 धावा देऊन 4 विकेट्स पटकावले. ज्यात एका निर्धाव षटकाचाही समावेश आहे. तर, पूनम यादव, स्नेह राणा आणि मेघना सिंहला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. विश्वचषकाच्या सामन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेला विजय भारतीय संघासाठी चांगली सुरुवात असेल. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha