Afghanistan vs Pakistan : टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. सुपर 12 मध्ये पाकिस्तानने आपला सलग तिसरा विजय मिळवला असून अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेल्या 148 धावांचे आव्हान पाकिस्तानने 19 व्या षटकात पार केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 51 धावा केल्या आहेत. 


19 व्या षटकात चार षटकार
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये झालेला हा सामना चांगलाच रंगतदार झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 147 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आलं. पाकिस्तानला शेवटच्या 12 चेंडूत 25 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे पाच गडी शिल्लक होते. 19 व्या षटकात पाकिस्तानचा फलंदाज असिफ अलीने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकत सामना खिशात घातला. 


टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा हा सलग तिसरा विजय आहे. या आधी पाकिस्तानने पहिल्यांदा भारताला आणि नंतर न्यूझीलंडला धूळ चारली होती. या विजयासोबत पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पाकिस्तानचे उर्वरित दोन सामने हे नामिबिया आणि स्कॉटलंड सोबत आहेत. 


पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर फखर जमा याने 25 चेंडूत 30 धावा केल्या. शेवटी असिफ अलीने सात चेंडूत नाबाद 25 धावा केल्या आणि पाकिस्तानचा विजय साकार केला. 


महत्वाच्या बातम्या :