Australia vs Bangladesh: दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सुपर 12 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दारुण पराभव करत उपांत्य फेरीत आपली मजबूत दावेदारी सादर केली. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 74 धावांचे सामान्य लक्ष्य ठेवले होतं, जे कांगारू संघाने अवघ्या 6.2 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने या लक्ष्याचा पाठलाग 82 चेंडू राखून केला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने नेट रनरेटच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर बांग्लादेश संघ केवळ 73 धावा करू शकला. यानंतर नेट रन रेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला मागे टाकण्यासाठी कांगारू संघाला हे लक्ष्य 8.1 षटकांत गाठायचे होते. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने केवळ 6.2 षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरॉन फिंचने 20 चेंडूत 40 धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि चार षटकार आले. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरने 14 चेंडूत 18 धावांची खेळी केली. अखेरीस मिचेल मार्शने पाच चेंडूंच्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेल खाते न उघडता नाबाद परतला.
अॅडम झम्पाच्या पाच विकेट घेतल्या
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झम्पाच्या (Adam Zampa) जादुई फिरकीसमोर बांग्लादेशचा एकही फलंदाज खेळू शकला नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या 73 धावांत गारद झाला. झम्पाने आपल्या चार षटकांत अवघ्या 19 धावा देत पाच बळी घेतले. कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बांग्लादेशच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. बांग्लादेशचा निम्मा संघ पॉवर प्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
बांग्लादेशकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शमीम हुसेनने सर्वाधिक 19 धावा केल्या. दुसरीकडे सलामीवीर मोहम्मद नईमने 17 आणि कर्णधार महमुदुल्लाह रियादने 16 धावा केल्या. या तिघांशिवाय बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्याचवेळी अॅडम झाम्पाने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक पाच बळी घेतले. याशिवाय जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कनेही प्रत्येकी दोन बळी घेतले. तर ग्लेन मॅक्सवेलला एक विकेट मिळाली.