ICC T-20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषकाची (ICC T-20 World Cup-2024) सुरुवात आगामी 2 जूनपासून होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करत आहेत. जवळपास अनेक संघांनी टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) देखील संघ जाहीर केला आहे. 


भारतीय संघात ऋषभ पंत (Rishbh Pant) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या दोन विकेटकीपरचा समावेश आहे. मात्र 11 जणांच्या संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यापैकी एकाचाच समावेश असणार आहे. यावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मेंटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने प्रतिक्रिया दिली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसनमध्ये भारतीय संघात पहिली पसंत कोणाची असणार याबाबत भाष्य केलं आहे. 


गौतम गंभीर काय म्हणाला?


भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने संजू सॅमसनपेक्षा ऋषभ पंतला प्राधान्य दिले. याची दोन कारणेही गंभीरने सांगितली आहेत. आयपीएलमध्ये पंत आणि सॅमसनच्या वेगवेगळ्या बॅटिंग पोझिशनबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, 'पंतने आयपीएलमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केली आहे, तर संजूने टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी केली आहे.' भारतातील अव्वल तीन रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांचा विचार करून मधल्या फळीत पंतची गरज असेल, त्यामुळे पंत माझी पहिली पसंत असल्याचं गंभीरने सांगितले.


'टॉप ऑर्डरची गरज नाही'


गंभीरने पंतच्या डावखुऱ्या फलंदाजीची शैली ही भारताच्या मधल्या फळीत विविधता आणणार असल्याचे सांगितले. डाव्या-उजव्या फलंदाजीच्या संयोजनाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, 'डाव्या हाताचा फलंदाज असल्याने पंत संघाच्या मधल्या फळीत विविधता आणू शकतो.' संघाच्या गरजा पाहता गंभीर म्हणाला, 'टीम इंडियाचे संयोजन पाहता, आम्हाला टॉप ऑर्डरमध्ये नव्हे तर त्या स्थितीत (मध्यम क्रमाने) फलंदाजी करणाऱ्या यष्टीरक्षकाची गरज आहे', असं गंभीर म्हणाला.


15 जणांचा भारतीय संघ पुढील प्रमाणे आहे-


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान


संबंधित बातम्या:


ICC T-20 World Cup 2024: दोनदा टोलावले 6 चेंडूत 6 षटकार; 9 चेंडूत अर्धशतक; टी-20 विश्वचषकात या खेळाडूवर असेल सर्वांचं लक्ष!


किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?


आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार