लंडन : विराट कोहलीच्या टीम इंडियाचा विश्वचषक मोहिमेतला दुसरा सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होत आहे. वन डे सामन्यांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे.
पण त्याच ऑस्ट्रेलियानं भारत दौऱ्यातल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवरून 3-2 असा सनसनाटी विजय साजरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला विश्वचषकाचा सामना अतिशय चुरशीचा होण्याची चिन्हं आहेत.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजवर 136 सामने खेळले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया संघ नेहमीच वरचढ राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियाने 77 सामन्यात तर भारताने 49 सामन्यात विजय साकारला आहे.
विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया 11 सामन्यात आमनेसामने आले असून ऑस्ट्रेलियाने 8 तर भारताने केवळ तीनदा विजय मिळवला आहे. विश्वचषकात देखील नेहमीच ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे दिसून आले आहे.
मात्र या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघ सध्या डळमळीत अवस्थेत आहे. असे असले तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा पेपर म्हणावा तितका सोपा नाही. कारण ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे.
हलक्या सरी बरसण्याची शक्यता
आज, संपूर्ण दिवस सूर्यप्रकाश असला तरी दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओव्हल स्टेडियमवर दुसऱ्यांदा फलंदाजी करणे अवघड मानले जाते. यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
टीम इंडियाने बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल. रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे (4/51) भारताने विश्वचषकात दमदार सुरुवात केली. रोहितच्या शतकामुळे भारताने आफ्रिकेचे 228 धावांचे लक्ष्य पार केले होते.
ICC Cricket World Cup : टीम इंडियासाठी दुसरा पेपर अवघड, आज ऑस्ट्रेलियाशी मुकाबला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2019 08:21 PM (IST)
ऑस्ट्रेलियानं भारत दौऱ्यातल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवरून 3-2 असा सनसनाटी विजय साजरा केला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -