AUS vs PAK, World Cup 2023 : हायस्कोरिंग सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 368 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 305 धावांपर्यंत मजल मारु शकला. अॅडम झम्पा, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतकी खेळी केली. तर अॅडम झम्पा याने चार विकेट घेतल्या. 163 धावांची विस्फोटक खेळी करणाऱ्या डेविड वॉर्नर याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव करून, विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शची शतकं, तसंच त्यांनी 259 धावांची दिलेली सलामी ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक ठरली. विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा विजय, तर पाकिस्तानचा दुसरा पराभव ठरला. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 368 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. पाकिस्ताननं त्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा डाव 305 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पानं चार, तर पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉयनिसनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, ऑस्ट्रेलियाच्या डावात डेव्हिड वॉर्नरनं 163 आणि मिचेल मार्शनं 121 धावांची खेळी उभारली.
368 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात दणक्यात झाली. पण त्यानंतर ठरावीक अतंराने विकेट पडल्या. अब्दुल्लाह शफीक 64, इमाम उल हक 70, मोहम्मद रिझवान 46 आणि सौद शकील 30 यांनी संघर्ष केला. पण इतरांची साथ न मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार बाबर आझम 18, इफ्तिखार अहमद 26 आणि मोहम्मद नवाज 14 यांना मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. अॅडम झम्पा याने चार फलंदाजांना तंबूत धाडले.
ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 9 विकेट्सच्या मोबद्लयात 367 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी बेंगळुरुमध्ये 19 षटकार मारले. शाहीन शाह आफ्रिदीने पाच विकेट घेत पाकिस्तानला सामन्यात परत आणले.
डेविड वॉर्नरचे वादळ -
मागील तीन सामन्यात मोठी खेळी करु न शकणाऱ्या वॉर्नरने आज पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. डेविड वॉर्नर याने पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. डेविड वॉर्नरने 124 चेंडूत 163 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 9 षटकार आणि 14 चौकार लगवाले आहेत. डेविड वॉर्नर याने एकापाठोपाठ एक चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यात पाकिस्तानची खराब फिल्डिंगनेही मदत केली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी वॉर्नरचे दोन झेल सोडले. डेविड वॉर्नरपुढे पाकिस्तानच्या गोलंदाजांनी लोटांगण घातले होते. मिचेल मार्श याने 9 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. मिचेल मार्श याने 108 चेंडूत 121 धावांची खेळी केली. मिचेल मार्श याने डेविड वॉर्नर याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 33.5 षटकात 259 धावांची भागीदारी केली.